News Flash

एकेरी रस्त्यांवर दुहेरी वाहतूक

एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यांवरून दुचाकीस्वार सर्रास विरुद्ध दिशेने जात असल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.

इंधनदरवाढीमुळे बेशिस्तीला जोर; वळसा टाळण्यासाठी दुचाकीस्वारांकडून नियम धाब्यावर

पुणे : एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यांवरून दुचाकीस्वार सर्रास विरुद्ध दिशेने जात असल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. इंधनदरवाढीनंतर अनेक दुचाकीस्वार वळसा टाळण्यासाठी नियमभंग करत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे रस्त्यासह मुंबई-बंगळुरू बाह्य़वळण मार्ग आणि अनेक प्रमुख रस्त्यांवर दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहन नेऊन नियमभंग करत असल्याचे चित्र आहे. अनेक रस्त्यांवर वळण्यासाठी साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतर पार करावे लागते. वळसा टाळण्यासाठी दुचाकीस्वार नियमभंग करतात.

इंधनदरवाढीनंतर असे प्रकार वाढले आहेत. डेक्कन जिमखाना भागातील जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता भागात दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने सर्रास वाहन नेतात. या दोन्ही रस्त्यालगत अनेक सोसायटी तसेच खासगी कार्यालये आहेत. अनेक दुचाकीस्वार लगतच्या गल्ल्यांचा वापर करून वळसा टाळतात.

पुणे स्टेशन परिसरात शासकीय मध्यवर्ती इमारत, नवीन प्रशासकीय इमारत ही महत्त्वाची कार्यालये आहेत. ससून रुग्णालयापासून डॉ. आंबेडकर पुतळा तसेच मध्यवर्ती शासकीय इमारत ते डॉ. आंबेडकर पुतळा उद्यानापर्यंत अनेक दुचाकीस्वार वळसा टाळण्यासाठी विरूद्ध दिशेने जातात.

इंधनदरवाढीमुळे अनेक दुचाकीस्वार नियमभंग करून विरुद्ध दिशेने जाण्याचा पर्याय निवडतात. नियमभंग करत असल्याची जाणीव अनेकांना असते. मात्र, एक मिनिटांच्या अंतरासाठी एक किलोमीटरचा वळसा का घालायचा, असा प्रश्न काही दुचाकीस्वारांनी उपस्थित केला आहे. दिवसेंदिवस इंधन महाग होत चालले आहे. नियम पाळले तर दररोज दोन ते तीन किलोमीटर वळसा घालावा लागतो, असे काही दुचाकीस्वारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

नियमभंग केले जाणारे काही मार्ग

  • जंगली महाराज रस्ता- साई सव्‍‌र्हिस पेट्रोल पंप ते संभाजी उद्यान
  • लक्ष्मी रस्ता- कुलकर्णी पेट्रोल पंप ते गरूड गणपती चौक, हिंदू महिला आश्रम
  • फग्र्युसन रस्ता- वैशाली हॉटेल ते रानडे इन्स्टिटय़ूट
  • कर्वे रस्ता- स्वातंत्र्य चौक ते रसशाळा चौक
  • सिंहगड रस्ता- नवशा मारूती मंदिर ते दत्तवाडी कोपरा
  • सिंहगड रस्ता- ब्रह्मा हॉटेल ते कांडगे पार्क परिसर
  • बाह्य़वळण मार्ग- नऱ्हे परिसर, वडगाव बुद्रुक
  • कौन्सिल हॉल चौक- नवीन प्रशासकीय इमारत परिसर
  • पुणे स्टेशन- ससून रुग्णालय ते डॉ. आंबेडकर पुतळा, शासकीय मध्यवर्ती इमारत

अपघातांना निमंत्रण; जीव धोक्यात

वळसा टाळण्यासाठी अनेक जण नियमभंग करत असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारांमुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळते. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असते. एखाद्या रस्त्यावर वाहतूक पोलीस नसल्यास दुचाकीस्वार नियमभंग करत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 4:48 am

Web Title: double traffic on single lane hike petrol prices ssh 93
Next Stories
1 शहरासह जिल्ह्य़ातील लसीकरणाचा ५७ लाखांचा टप्पा पार
2  भंगारातील पेंट्रीकारचे ‘अन्नपूर्णा’त रूपांतर!
3 शहरात लवकरच ई-बाइकची धाव