पुणे : शहरातील रुग्णसंख्येच्या दुपटीचा वेग पूर्वपदावर येत १७ दिवसांवरून १९ दिवसांवर आला आहे. पुणे महापालिके च्या आरोग्य विभागातर्फे  नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. शहरातील करोना चाचण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढवण्यात आली असली, तरी मागील आठवडय़ात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग १९ दिवसांवरून १७ दिवसांवर आल्यामुळे चिंतेचे वातावरण होते, मात्र हा वेग पूर्वपदावर आल्याने आरोग्य यंत्रणांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

शहरातील करोना रुग्णनिदान चाचण्यांची संख्या मागील काही दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. शहरात दिवसाला पाच हजारांच्या घरात चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्याही मोठय़ा प्रमाणात आढळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस शहरातील करोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग १४ दिवस एवढा होता. जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मात्र शहरातील रुग्णसंख्या दुपटीचा वेग १४ वरून १९ दिवसांवर जाऊन तो तसाच स्थिरावल्याचे पाहायला मिळाले. जून महिन्यात हा वेग वाढला नाही तरी तो कमीही झाला नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ठरत होती. जुलैच्या पहिल्या आठवडय़ातील रुग्णसंख्येच्या विश्लेषणातून रुग्णदुपटीचा वेग दोन दिवसांनी कमी झाल्याचे दिसून आले होते, दुसऱ्या आठवडय़ात मात्र हा वेग पुन्हा पूर्वपदावर येऊन १९.७१ दिवस एवढा झाला आहे.