आमच्या बँकेच्या ठेवींमध्ये गेल्या वीस दिवसांत साडेतीनशे कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. हे खातेदारांच्या दृढ विश्वासाचे प्रतीक आहे. आमच्या बँकेच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही, असे कॉसमॉस बँकेचे मानद अध्यक्ष डॉ.मुकुंद अभ्यंकर यांनी सांगितले.
आमची बँक बुडणार आहे किंवा बँकेचे विलीनीकरण होणार आहे अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे सांगून डॉ.अभ्यंकर म्हणाले,की अफवांमुळे सहकारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, छोटय़ा स्वरुपाच्या सहकारी बँका आदी संस्थांनी झटपट ठेवी काढण्यास सुरुवात केली. मात्र ते प्रमाण कमी झाले आहे. सर्व खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. ३१ मार्च २०१४ मध्ये बँकेच्या ठेवी १४ हजार ७०० कोटी रुपये होत्या. ३१ मार्च २०१५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत त्यामध्ये ११०० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. बँकेस ५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून आम्ही १२ टक्के लाभांश देण्याचीही शिफारस केली आहे. रिझव्र्ह बँकेकडून त्यासाठी परवानगीही मागितली आहे. बँकेचा राखीव निधी १३६८ कोटी रुपयांवरुन १५४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हे लक्षात घेता आमची बँक अतिशय सक्षम आहे. अनुत्पादित कर्जाचे प्रमाण दहा टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. या कर्जाच्या वसुलीवरही आम्ही भर दिला आहे.
रोझरी प्रशालेस आम्ही ४० कोटी रुपयांचे कर्ज दिले असून त्यासाठी साठ कोटी रुपयांची मालमत्ता तारण घेतलेली आहे. त्यामध्ये तळेगावच्या मालमत्तेचा समावेश नाही. तसेच, या कर्जापोटी आम्हास डिसेंबरअखेपर्यंतचे ४१ कोटी रुपयांचे धनादेश मिळालेले आहेत. त्यामुळे हे कर्ज शंभर टक्के वसूल होणार आहे, असेही डॉ. अभ्यंकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,‘रिझव्र्ह बँकेकडून नवीन शाखा सुरू करण्याबाबत पूर्वी बंधने होती, त्यामुळे आम्ही तोटय़ात असलेल्या पंधरा बँकांचे आमच्या बँकेत विलीनीकरण करुन घेतले. या विलीनीकरणामुळे आमच्या साठ शाखा वाढल्या आहेत. अहमदाबाद व अमरावती येथील प्रत्येकी एका बँकेचा तोटा अद्याप शंभर टक्के भरुन निघाला नसला तरी लवकरच हा तोटा भरुन निघेल. अहमदाबाद येथील बँकेची चाळीस कोटी रुपयांची मालमत्ता आम्हास मिळाली आहे. ही किंमत आम्ही या बँकेच्या तोटय़ाबाबत धरलेली नाही, अन्यथा यापूर्वी हा तोटा भरुन निघाला असता. आता नवीन शाखांना परवानगी मिळत असल्यामुळे आम्ही गेल्या तीन वर्षांत एकही बँक विलीन केलेली नाही.