अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) संचालकपदी डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांची नियुक्ती झाली आहे.
डॉ. सहस्रबुद्धे हे २००६ पासून पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी (सीओईपी) महाविद्यालयाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. बंगळुरू येथील इंडियन इिन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये त्यांनी पीएच.डी. केली आहे.
नियुक्तीनंतर देशातील तंत्रशिक्षणातील आव्हानांबाबत डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘देशात तंत्रशिक्षणाच्या विशेषत: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अनेक जागा रिक्त राहात आहेत. त्याअनुषंगाने नव्या महाविद्यालयांना देण्यात येणारी मान्यता हे यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. महाविद्यालये सुरू करण्याचे स्वातंत्र्य शिक्षणसंस्थांना राहीलच. मात्र, महाविद्यालयांचा दर्जा वाढण्याच्या दृष्टीने परवानगीचे निकष अधिक कडक होणे आवश्यक आहे. शिक्षक आणि विद्यार्थी संख्येच्या गुणोत्तराचे निकषही अनेक महाविद्यालये पाळत नाहीत. अशा महाविद्यालयांबाबतही कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षणातील संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि उद्योगांच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रमांत बदल करणे आवश्यक आहे. अशी अनेक आव्हाने सध्या तंत्रशिक्षणाबाबत आहेत. त्याअनुषंगाने कामाची दिशा ठरवली जाईल.’