राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही स्वातंत्र्यलढय़ात नव्हता. गांधीवाद, नेहरूंच्या विचारांना संघाने वेगळी संघटना निर्माण करून विरोध केला, असे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पिंपरीत बोलताना सांगितले.
देशातील जातीयवाद संपला नाही. दादरच्या हिंदूू कॉलनीत आणि पुण्यातील सदाशिव पेठेत स्वयंस्फूर्तीने बाबासाहेबांची जयंती साजरी होईल, तेव्हा देशातील जातीयवाद संपला असे म्हणावे लागेल, अशी टिप्पणी त्यांनी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसने डॉ. मुणगेकरांचे व्याख्यान आयोजित केले होते, तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष सचिन साठे होते. डॉ. मुणगेकर म्हणाले, की ‘भारत माता की जय’ म्हणा असे आदेश ‘नागपूर’मधून होत असतील तर ते म्हणू नये. हे सर्व मुस्लिमांना वेठीस धरण्यासाठी सुरू आहे. सगळेच हिंदूू राष्ट्रभक्त आहेत याला पुरावा काय? ब्राह्मणी व्यक्तीला नव्हे, तर प्रवृत्तीला आपला विरोध आहे. बेकारी, सिंचन, पाणी, आरोग्य असे अनेक प्रश्न आहेत; ते सोडवण्याऐवजी सरकारचे ‘भारत माता की जय’चे राजकारण सुरू आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक व स्वागत सचिन साठे यांनी केले. सूत्रसंचालन गौतम आरकडे यांनी केले. क्षितिज गायकवाड यांनी आभार मानले.
या देशातील सर्व जमीन स्त्रियांच्या नावे करावी व ती विकण्याचा अधिकार पुरूषांना असू नये, अशी मागणी संसदेत करणार आहे.
– डॉ. भालचंद्र मुणगेकर, खासदार