News Flash

आर्य हे बाहेरून आलेले नाहीत- डॉ. ढवळीकर

हडप्पा संस्कृती आणि आर्य संस्कृती या समकालीन असाव्यात, असा निष्कर्ष सांगून पुरातत्त्वशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांनी आर्य हे बाहेरून आलेले नाहीत,

| August 31, 2014 03:25 am

हडप्पा संस्कृती आणि आर्य संस्कृती या समकालीन असाव्यात, असा निष्कर्ष पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यांच्या आधारे सिद्ध होत असल्याचे सांगून  पुरातत्त्वशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांनी आर्य हे बाहेरून आलेले नाहीत, असे मत शनिवारी व्यक्त केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा स्मृतिदिन आणि ऋषिपंचमीचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ‘वैदिक परंपरा आणि पुरातत्त्वशास्त्र’ या विषयावर डॉ. म. के. ढवळीकर यांचे व्याख्यान झाले. खासदार डॉ. सत्यपाल सिंह, संस्थेचे अध्यक्ष अॅड. सदानंद ऊर्फ नंदू फडके, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया या वेळी उपस्थित होते.
वैदिक वाङ्मयामध्ये दंतकथा आहेत. पण, केवळ वैदिक वाङ्मयामध्येच नाहीत तर, बायबलमध्येही दंतकथा आहेत. जोपर्यंत या दंतकथांसंदर्भात पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न उपस्थित करून डॉ. ढवळीकर म्हणाले, बंगाल आणि महाराष्ट्रापर्यंत सिंधू संस्कृतीचे लोक पोहोचलेले होते. त्याच मार्गाने आर्याचाही प्रवास झालेला दिसतो. या दोन्ही संस्कृती समकालीन असाव्यात, असे पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यांच्या आधारे सिद्ध होते. तसेच यासंबंधीचे उल्लेख ऋग्वेदामध्येही आहेत.
डॉ. सत्यपाल सिंह म्हणाले,‘‘ब्रिटिशांनी आणलेल्या शिक्षण पद्धतीमुळे आर्य हे बाहेरून आलेले आहेत असाच समज प्रस्थापित झालेला आहे. आपल्या बुद्धिवंतांनी सारासार विवेकाच्या आधारे अभ्यास आणि संशोधन करण्याऐवजी वाङ्मय चौर्य करण्यामध्ये धन्यता मानली.’’
अभय फिरोदिया म्हणाले,‘‘आपल्याकडे श्रवण संस्कृती ही मूळ तर, वैदिक संस्कृती नंतरची आहे, असे विद्वानांचे मत आहे. कोणत्याही विषयाचा वेध घेताना अभ्यासकाने इतिहास, लोककथा, विज्ञान आणि पुरातत्त्व स्थळांतून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे संशोधन करून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.’’
नंदू फडके यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. मैत्रेयी देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. राहुल सोलापूरकर यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:25 am

Web Title: dr dhavalikars speech
Next Stories
1 पर्वती, कोथरूड, वडगावशेरीतील काँग्रेस इच्छुकांच्या आज मुलाखती
2 फेसबुकच्या माध्यमातून आपण आभासी जगामध्ये जगतो- डॉ. अवचट
3 पुणे ते मंत्रालय मार्गावर उद्यापासून एसटीची ‘शिवनेरी’!
Just Now!
X