News Flash

नामवंतांचे बुकशेल्फ : आपल्या आयुष्याची उत्तरे धर्मग्रंथांमध्येच

  वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांनी मला दासबोध वाचण्यास प्रवृत्त केले. त्या

डॉ. धुंडीराज पाठक (वेद आणि पुराण अभ्यासक)

मोरयाबद्दलचे अधिकृत वाङ्मय असलेल्या मुद्गल पुराण आणि गणेश पुराणातून गणरायाची विविध रूपे मी अनुभवत गेलो. दर चतुर्थीला मोबाईल बंद करून दिवसभर मौन पाळत स्तोत्रवाचन आणि पुराणांमध्ये रमणे मला आवडते. त्यामुळे माझे विचार आणि बुद्धीमध्ये अनेक चांगल्या गोष्टींची भर पडली आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये मनुष्यजीवनाचे सार दडलेले असून आयुष्याची उत्तरे शोधण्यासाठी धर्मग्रंथांचे वाचन मला महत्त्वाचे वाटते. श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माझ्या वाचनप्रवासात भावलेल्या वेद-पुराणांतील विचारांचा मौलिक खजिना समोर ठेवत आहे.

सोलापूरमधील करमाळा हे आमचे मूळ गाव. माझे वडील शंकरराव हे गणेश उपासक असल्याने आमच्या घरामध्ये सर्व प्रकारचे धर्मग्रंथ होते. वडिलांना वाचायचा छंद असल्यामुळे घरामध्ये निरनिराळी पुस्तके होती. गावातील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. त्यावेळी  शिंदे सरांनी निबंध लेखन आणि व्यायामाकरिता प्रवृत्त केले. निबंध लेखनामध्ये मला बक्षिसे मिळाली. रामायण, महाभारतातील कथांच्या वाचनासोबत महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे साहित्य वाचनात आले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांचे साहित्य वाचले.

वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांनी मला दासबोध वाचण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्यातील शब्दसंग्रह आजही मला उपयोगी पडतो. गीता आणि दासबोध हे तरुण वयातच वाचण्याचे ग्रंथ आहेत. आयुष्य कसे जगावे, निर्णय कसे घ्यावे, निखळ व्यवहार कसे असावे, याचे शिक्षण या ग्रंथांमध्येच मला मिळाले. त्यामुळे माझ्या बुकशेल्फमध्ये वेद, उपनिषदे, पुराणे, वास्तू आणि ज्योतिषविषयक ग्रंथ आहेत. गणपतीविषयी वेगवेगळ्या प्रकारची माहिती असलेले ‘अंकुश’ नावाचे मासिक मोरगावमधून प्रसिद्ध होत असे, त्याचे सर्व अंक माझ्याकडे आहेत. गणपतीविषयक विस्तृत अभ्यास आणि लेखन करणारे धुंडीराजशास्त्री दाते, गजाननशास्त्री पुंड, तात्या तिवारी यांच्या साहित्यातून मला गणेश तत्त्वज्ञान उमगत गेले. तर, गोिवददेव गिरी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या लेखनाने मी भारावून गेलो. डॉ. भा. नि. पुरंदरे यांचे ‘शल्यकौशल्य’, ‘योगी कथामृत’, ‘तृतीय नेत्र’ ही पुस्तके , आद्य शंकराचार्याचे साहित्य मी संग्रही ठेवले आहे. ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचणे मला आवडत नाही. पुस्तकांची खरेदी करून त्यामधील मला उपयोगी नोंदी मी काढतो.

नोकरीच्या निमित्ताने १९७९ मध्ये मी पुण्यात आलो आणि काही वर्षांनंतर गणपती पुराण, ज्योतिष, अध्यात्म, वास्तुशास्त्र या विषयांच्या अभ्यासाकडे वळालो. भारतीय तत्त्वज्ञानाच्या साहित्याचे वाचन हा माझा आवडता छंद. वाचलेल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर मी महत्त्वाच्या नोंदी मी काढतो. त्यामुळे पुस्तकाचे पहिले पान पाहिले, की त्यातील संदर्भ मला लगेचच सापडतात. माझ्याकडे पंडित सातवळेकर, चित्रावशास्त्री, बापटशास्त्री, श्रीराम शर्मा आचार्य यांची नानाविध पुस्तके आहेत. अनेकदा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर व्याख्यानांसाठी गेल्यावर हे संदर्भ मला उपयुक्त ठरतात. माझ्या सुदैवाने मला म. दा. भट यांच्यासारखे शिक्षक लाभले. यशवंत मग्गीरवार यांनी मला पुस्तक वाचावे कसे, याविषयीचे धडे दिले. त्यामुळेच मी आज एक उत्तम वाचक म्हणून पुस्तकांतील शब्दरुपी खजिना लुटू शकतो.

आप्पा बळवंत चौकात नारो आप्पाजी गोडबोले, नेर्लेकर यांच्याकडून अनेक पुस्तके मी विकत घेतो. आचार्य अत्रे, िवदा करंदीकर, पु. ल. देशपांडे यांची पुस्तके मी वाचली आहेत. मराठीमधील कथा, कादंबऱ्या प्रत्येक वाचकावर वेगळे संस्कार करतात, हा माझा अनुभव आहे. परंतु माझ्या वाचनप्रवासात मी मराठीप्रमाणेच िहदी आणि इंग्रजी पुस्तकांचे वाचन केले. मानसशास्त्राविषयीचे अनेक ग्रंथ माझ्या वाचनात आले. माझ्या बुकशेल्फमध्ये समरांगणसूत्रधार, वास्तुमज्जरी, वास्तुविद्या, राजमरतड:, विश्वकर्मप्रकाश:, श्रीमहाविश्वकमपुराणम्, कलानिधी, उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरुपण, प्राचीन भारतीय वृक्षायुर्वेद, आरोग्य आणि यशसंपदेसाठी अशी नानाविध विषयांची पुस्तके आहेत. त्यासोबतच कुरआन, बायबल हे ग्रंथही मी अभ्यास म्हणून वाचले आहेत. वृद्धापकाळात एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन इतरांची सहानुभूती मिळविणे, मला कधीही आवडणार नाही. प्रत्येकाने वाचनाचा वैयक्तिक छंद जोपासल्यास एकटेपणा दूर होऊ शकतो. त्याकरिता वाचन आणि पुस्तकांसारखे सोबती हा चांगला मार्ग आहे. आपण एकटे असतो, तरी पुस्तके कधीही आपली साथ सोडत नाहीत. त्यामुळेच वेद, उपनिषदे, गाथा यांसारख्या स्वयंपूर्ण ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन आपण प्रत्येकाने सातत्याने करायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 4:06 am

Web Title: dr dhundiraj pathak bookshelf
Next Stories
1 पुण्यात लाडक्या गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी
2 मावळमध्ये चि.बांधकाम विभाग आणि चि. सौ.का. खड्डेताई यांचा अनोखा विवाह सोहळा
3 पिंपरी-चिंचवड पालिकेत सभापतींची ट्रॅक्टरमधून एन्ट्री
Just Now!
X