‘प्राज इंडस्ट्रीज’चे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेच्या जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशनने (बायो) केली. हा जागतिक सन्मान प्राप्त करणारे चौधरी हे पहिले भारतीय तर, दुसरे आशियाई आहेत.

जैवतंत्रज्ञान उद्योग समूहात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘बायो इम्पेक्ट डिजिटल कॉन्फरन्स’दरम्यान मंगळवारी (२२ सप्टेंबर) त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जगातील ३० देशांत कार्यरत असलेल्या जैवतंत्रज्ञानाची सर्वात मोठी व्यापार संघटना असलेल्या बायोतर्फे अयोवा बायोटेक्नॉलॉजी असोसिएशनच्या मदतीने २००८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. जैव आधारित अर्थव्यवस्था स्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल चौधरी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

औद्योगिक जैवविज्ञानातील माझे काम जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर यांच्या कार्याला समर्पक आणि पुढे नेणारे आहे. हा सन्मान माझ्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या कामासाठी ३५ वर्षांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती आहे, अशी भावना प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केली.