सातारा जिल्ह्य़ातील रहिमतपूर गावातील डॉ. आर. एस. काटकर यांनी नुकतेच टय़ूबल मायक्रोसर्जीकल रिकॅनालायझेशन (गर्भाशयाच्या नळ्यांची पुनजरेडणी) या शस्त्रक्रियेचे पेटंट मिळवले. संपूर्ण आशिया खंडात या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी पेटंट मिळवणारे ते पहिले डॉक्टर ठरले आहेत.
मुले न होण्यासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते त्यामध्ये स्त्रीच्या गर्भाशयाच्या नळ्या बंद केल्या जातात किंवा कापल्या जातात. टय़ूबल मायक्रोसर्जीकल रिकॅनालायझेशन शस्त्रक्रियेमध्ये या नळ्या पूर्ववत जोडल्या जातात. ही शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साहाय्याने केली जाते. यासाठी केसापेक्षाही बारीक धागा वापरला जातो, अशी माहिती डॉ. काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमेरिकेमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे, तर भारतात ४० ते ८० टक्के आहे, असे डॉ. काटकर यांनी सांगितले. हे प्रमाण १०० टक्के का असू नये असा विचार करून डॉ. काटकर यांनी संशोधन केले आहे. दोन वर्षांमध्ये त्यांनी सुमारे १५० शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि त्यातील ९० टक्के लोकांना त्याचा फायदा झाला आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टय़ा सबल नसणाऱ्यांसाठी अल्प दरात ही शस्त्रक्रिया करून दिली जाते. मेडिकल टूरिझमच्या माध्यमातून परदेशी रुग्णांवरही उपचार करणे सहज शक्य होणार आहे.
ज्या स्त्रीची मुल न होण्याची शस्त्रक्रिया झाली आहे पण न्युमोनिया सारखे आजार, अपघात किंवा अन्य काही कारणाने मुल दगावले असेल आणि त्या स्त्रीला पुन्हा गर्भधारणेची इच्छा असेल किंवा एखाद्या स्त्रीचे दुसरे लग्न झाले असेल अशा स्त्रियांना या शस्त्रक्रियेचा फायदा होणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे स्त्री पुन्हा नैसर्गिकरित्या गर्भवती राहू शकते, असेही काटकर म्हणाले.