दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे डॉक्टरांनी एका वर्षांतच तुम्ही मरणार असे केलेले भाकीत.. आठवडय़ातून दोनदा करावे लागणारे डायलिसिस.. एकदा शस्त्रक्रिया करायची ठरल्यानंतर आईने दिलेली किडनी.. १६६ टाक्यांच्या वेदना सहन करून मला पाहण्यासाठी आलेली आई.. मिळालेला पुनर्जन्म रुग्णांच्या सेवेसाठीच हा घेतलेला निर्णय.. अशा आठवणींचा पट उलगडत ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘चांगल्या कामाचे आशीर्वाद विज्ञानावरही मात करतात’, असे सांगितले.
सहजीवन व्याख्यानमालेमध्ये ‘मी कसा घडलो’ या विषयावर डॉ. तात्याराव लहाने यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. माकेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील एका गरीब घरात झालेला जन्म, आई-वडील, पाच बहिणी आणि दोन भाऊ असे तब्बल दहा माणसांचे कुटुंब, शेतमजूर वडील अशा प्रतिकूलतेवर मात करीत घरातील एकमेव शिक्षित मुलगा ते एक लाख नेत्रशस्त्रक्रिया करणारा डॉक्टर असा जीवनप्रवास त्यांनी मांडला.
दुसऱ्याच्या शेतावर दर रविवारी कापूस वेचणे आणि शेंगा काढणे ही कामे करून एक रुपया मिळायचा. शाळेची मान्यता टिकण्यासाठी दहा मुले असली पाहिजेत हा नियम असल्यामुळे शाळेत जाण्याचे नशिबी आले. दहावीपर्यंत चार महिन्यांपेक्षा जास्तकाळ शाळेतच गेलो नाही. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आणि दहावीला जिल्ह्य़ात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. गावाला येण्यासाठी लाल डब्याची गाडीही नव्हती. १४ किमी पायी जावे लागायचे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेतला तरी सुरूवातीला एका कंडक्टरच्या घरी राहिलो होतो. खांद्यावर कावड घेऊन २५ खेपा असे ५० घागरी पाणी झाडांना देत असे. त्याचे महिन्याला ३० रुपये मिळायचे. १९७६ मध्ये गावी आल्यानंतर आपल्यावर ११ हजारांचे कर्ज असल्याने तुझे शिक्षण बंद असे वडिलांनी सांगितले. मग, ‘एमबीबीएस’ला प्रवेश घेताना वसतिगृहामध्ये सात मुलांचा स्वयंपाक करायचो. हे काम करून माझे जेवण फुकट व्हायचे. खरे तर, मला हाडांचा किंवा लहान मुलांचा डॉक्टर व्हायचे होते. पण, डोळ्यांचा डॉक्टर झालो. डॉक्टर झाल्यानंतर ग्रामीण भागात रुग्ण मिळविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. लोकांना पटवून त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. सुदैवाने साऱ्या लोकांना दिसायला लागल्यानंतर माझ्यावरचा विश्वास वाढला. आईचा आशीर्वाद आणि रुग्णांचे प्रेम यामुळे मी घडलो. डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवनमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान लाभले. आता उर्वरित आयुष्यात गरीब रुग्णांची सेवा करायची हेच उद्दिष्ट ठेवले आहे.