महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठय़ा संख्येने रिंगणात असलेले प्रकाशक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक, रंगकर्मी आणि एकपात्री कलाकारांच्या भाऊगर्दीमध्ये लेखक बिचारे सापडेनासे झाले आहेत. कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोशाध्यक्ष या तीन महत्त्वाच्या पदांसाठी उभे असलेल्यांमध्ये केवळ एकच लेखक आहे. त्यामुळे ‘साहित्य म्हणजे रे काय भाऊ’ असे विचारण्याची वेळ आता साहित्यप्रेमी रसिकांवरच आली आहे.
शतक पार केलेली राज्यातील आद्य साहित्य संस्था असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी उभे असलेल्या नावांच्या यादीवरून नजर फिरविली तरी साहित्य म्हणजे काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडावा अशीच स्थिती आहे. विद्यमान कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी परिषदेच्या कामातून निवृत्ती घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या पदासाठी आता पंचरंगी निवडणूक होणार आहे. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन हे दोघे प्रमुख कार्यवाह पदासाठी परस्परांविरोधात लढणार आहेत. पुण्यामध्ये झालेल्या ८३ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई हे पुन्हा एकदा तर, सासवड येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते हे राजकारणी नव्याने रिंगणात आले आहेत. या संमेलनातील घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर विद्यमान कार्यकारिणीमध्ये देसाई यांचा समावेश असला तरी माधवी वैद्य यांनी त्यांना आपल्या पॅनेलमध्ये घेतले नव्हते. ती कसर आता देसाई यांनी कोशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करीत भरून काढली आहे.
या निडणुकीसाठी विक्री झालेल्या १३३ अर्जापैकी ९० अर्ज दाखल झाले. नगर जिल्हा प्रतिनिधीपदासाठीचा अर्ज अवैध ठरला. तर, बिनविरोध निवड झालेल्या ठाणे, नाशिक, सांगली, धुळे-नंदूरबार जिल्ह्य़ांचे सात प्रतिनिधी आणि पुणे शहर स्थानिक कार्यवाह अशा आठ जागा वगळता २५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. अर्थात माघारीनंतर बुधवारी (२७ जानेवारी) अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या असलेल्या नावांची खोगीरभरती पाहता परिषदेच्या भावी काळातील वाङ्मयीन कर्तृत्वाविषयी शंका उपस्थित व्हावी अशीच परिस्थिती आहे.

म्हणूनच माझी निवृत्ती – वैद्य
गेली दहा वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करीत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले त्याचवेळी निवृत्त व्हायचे असे ठरविले होते. हे महत्त्वाचे पद भूषविल्यानंतर पुन्हा परिषदेमध्ये काम करण्याऐवजी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून यंदा निवृत्तीचा निर्णय अमलात आणला असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. वैद्य यांच्यासमवेत कार्यवाह असलेल्या डॉ. कल्याणी दिवेकर आणि महेंद्र मुंजाळ या दोघांनीही थांबण्याचा निर्णय घेतला आहे.