हिंदूुस्थान हे हिंदूूंचे राष्ट्र आहे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची धारणा होती. हिंदू धर्म, संस्कृती आणि समाज यांचे संरक्षण आणि प्रगती हेच हिंदूुराष्ट्राचे उद्दिष्ट आहे. ही दृष्टी नसल्याने कितीतरी गोष्टी विपरीत घडल्या, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केले.
संस्कृती जागरण मंडळाच्या सांस्कृतिक वार्तापत्र पाक्षिकातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, महानगर संघचालक शरद ऊर्फ बापू घाटपांडे, विशेषांकाचे संपादक डॉ. श्रीरंग गोडबोले आणि सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मििलद शेटे या वेळी व्यासपीठावर होते.
संघ कळायचा असेल, तर डॉ. हेडगेवार कळलेच पाहिजेत. अनुशासन, िहदुत्वाची विचारधारा यापेक्षाही संघामध्ये कोणत्याही गोष्टीचे मूळ हेडगेवार हेच आहेत, असे सांगून भागवत म्हणाले, संघ शाखा माणूस घडविण्याचे काम करतात. व्यक्तित्वाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पार्थिवाच्या विलीनीकरणाने पूर्ण झाली. १९२५ ते १९३९ पर्यंतच्या काळात संघाच्या शरीराचे प्रयोग झाले. संघ या आत्म्याला शरीराची चेतना ही डॉ. हेडगेवारांची आहे. संघामध्ये येणाऱ्या पिढीलाही डॉ. हेडगेवार अनुसरायचे आहेत. माझा जन्म १९५० मधील. मी डॉ. हेडगेवार यांना पाहिलेले नाही. पण, संघाच्या प्रत्येक गोष्टीत ते आहेत. हेडगेवार यांच्या व्यक्तित्वाचे, कर्तृत्वाचे विस्तृत स्वरूप म्हणजे संघ. माणसांना जोडणे आणि ध्येयानुरूप जीवनशैलीचा अंगीकार करायला लावण्याचे काम संघाने केले. आता परिस्थिती आणि कृतीचे रूप बदलले आहे. पण, कृतीची दिशा, तत्त्व, दृष्टी तीच आहे. संघटनशास्त्राचे तज्ज्ञ असलेल्या हेडगेवार यांनी एक-एक माणूस ओळखून जोडला आणि कर्तृत्वाने घडविला. त्यामुळे कोणीही त्यांची कार्बन कॉपी झाले नाही. प्रत्येक झाड वेगळे आहे. पण, ते सारखे आहे.
‘काम सुस्थितीत असल्याखेरीज अकाली प्रसिद्धी घेणे योग्य नाही हे तू जाणतोसच’ असे पत्राद्वारे सांगून हेडगेवार यांनी संघ कार्यकर्त्यांला पत्रातून सांगितले होते. या आठवणींना उजाळा देत भागवत म्हणाले, शुद्ध सात्त्विक प्रेम हा कार्याचा आधार आहे. ‘प्रत्येक गोष्ट नेमकेपणाने’ ही त्यांची हातोटी होती. विचारामध्ये आणि दृष्टीमध्ये गोंधळ नाही. या दृष्टीच्या अभावामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला तुकडय़ाने दिसते. हेडगेवार यांची उपलब्ध सामग्री पुन्हा वाचून त्या जीवनाच्या स्वभावाचे अंग बनविणे हाच शाश्वततेचा मार्ग आहे.
डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी आपल्या मनोगतातून विशेषांकाचे अंतरंग उलगडले. मििलद शेटे यांनी प्रास्ताविकामध्ये सांस्कृतिक वार्तापत्राची माहिती दिली. शैलेंद्र बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.