मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ ही कल्पना स्वागतार्ह आहे. मराठी भाषेसाठी कार्यरत असलेले राज्यातील सर्व विद्यापीठांचे मराठी विभाग, राज्य मराठी विकास संस्था, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळ या संस्था उत्कृष्ट काम करीत असतील, तर स्वतंत्र मराठी विद्यापीठाची आवश्यकताच भासणार नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक-शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
डॉ. न. म. जोशी हे रविवारी (११ जानेवारी) ८० व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. सध्याचे शिक्षण विद्यार्थिकेंद्री नाही आणि माणूस केंद्रिबदू धरून साहित्यनिर्मिती होत नाही याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले.
भाषा सल्लागार समितीने विविध विषयांवरील ४८ कोशांची निर्मिती करण्याची शिफारस राज्य सरकारला केली असून त्याबरोबरीनेच मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्लाही दिला आहे. पण, ज्या उद्दिष्टांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करायचे त्याचा कोणताही निश्चित कृती कार्यक्रम समितीने सुचविलेला नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमाविना विद्यापीठ स्थापन केले तर ती भाषिक आणि सांस्कृतिक चैन ठरेल, असेही डॉ. न. म. जोशी यांनी सांगितले.
सध्याचे शिक्षण विद्यार्थिकेंद्री नाही आणि माणूस केंद्रिबदू धरून साहित्यनिर्मिती होत नाही, याकडेही डॉ. न. म. जोशी यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले,‘‘आधुनिक काळात शिक्षण हे शिक्षण संस्थाकेंद्री झाले आहे. सरकारच्या धोरणात विद्यार्थी हाच केंद्रिबदू आहे. पण, या धोरणाची अंमलबजावणी विद्यार्थिकेंद्री मुळीच नाही. गेल्या २५ वर्षांत समाजामध्ये काही समस्या उग्र झालेल्या दिसतात आणि माणूस आपल्या व्यापामध्ये व्यग्र झालेला आहे. त्याचे चित्र साहित्यामध्ये उमटताना दिसत नाही. माणसाच्या मनाची कोंडी साहित्यामध्ये आविष्कृत झाली पाहिजे आणि ती कोंडी सुटण्याचे मार्गही साहित्याने दाखविले पाहिजेत. ज्या साहित्यातून हे प्रतििबब उमटत होते ते दलित साहित्य हेदखील दुर्दैवाने आता एकसुरी झाले आहे.’’