महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणामध्ये शेकडो शक्यतांमधून काही निवडक शक्यतांभोवती आता तपास केंद्रित झाला आहे, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी व सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्टला हत्या झाली होती. या हत्येला गुरुवारी पन्नास दिवस पूर्ण झाले. या पाश्र्वभूमीवर भामरे यांनी या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीबाबत पत्रकारांना माहिती दिली. भामरे म्हणाले की, दाभोलकरांची हत्या झाल्याच्या परिसरातील सुमारे सहाशेहून अधिक नागरिकांकडे चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून काही उपयुक्त माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या भागात घरोघरी जाऊन माहिती घेतली. सुरुवातीला पोलिसांसमोर या हत्येबाबत शेकडो शक्यता होत्या. त्यातील काही शक्यता बाजूला पडल्या आहेत. त्यामुळे काही ठराविक शक्यतांवर तपास करण्यात येत आहे. मात्र, बाजूला टाकण्यात आलेल्या शक्यतांवरही लक्ष कमी करण्यात आलेले नाही. अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा तपास आहे. गुन्ह्य़ाची व्याप्ती मोठी असल्याने तपासाला वेळ लागत असला तरी आम्ही गुन्ह्य़ाचा छडा लावण्यात यशस्वी होऊ.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शहरातील २० पथके व बाहेरील १४ पथके या तपासात काम करीत आहेत. तपासादरम्यान लावलेल्या १६ सापळ्यांमधून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सीसीटीव्ही फूटेजची तपासणी, मोबाईल कॉलच्या माहितीची पडताळणी व जीपीआर डाटा तपासणीसाठी संगणकावर अहोरात्र काम करण्यात येत आहे, असेही भामरे यांनी सांगितले.