महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (सोमवारी) पाच वर्षे पूर्ण होत असून हत्येमागील मास्टरमाईंड अजूनही सापडत नाही. याच्या निषेधार्थ पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘जवाब दो’ निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले. सोनाली कुलकर्णी, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, मेधा पानसरे हे या रॅलीत सहभागी झाले.

अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यासारख्या अनिष्ट रुढी परंपरांविरुद्ध लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. अखेर पाच वर्षांनी या प्रकरणात पोलिसांनी शरद कळसकर (वय २९) आणि सचिन अंदुरे या दोघांना अटक केली. या दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे. कळसकरला १० ऑगस्टरोजी नालासोपारा येथून अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान डॉ. दाभोलकर यांच्या हत्येत प्रत्यक्ष सामील असल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा अद्याप शोध सुरु आहे.

दुसरीकडे डॉ. दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी ‘जवाब दो’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील रॅलीत हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्यासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, बाबा आढाव, लक्ष्मीकांत देशमुख, मेधा पानसरे आदी सहभागी झाले.

नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. ही दुर्देवी बाब असून त्यांच्या मारेकऱ्याचा शोध लागला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केली.

पाच वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोलकर यांची याच पुलावर हत्या करण्यात आली. त्यांची हत्या केली असली तरी डॉ. दाभोलकरांचे विचार अजून थांबलेले नाही. तुम्ही माणसाला संपवले तरी त्याचे विचार कधीच संपवता येणार नाही, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे, असे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.