एखाद्या रंगीत कॅप्सूलच्या माध्यमातून कडू औषध द्यावे. त्याच पद्धतीने समाजातील चुकीच्या गोष्टी रंजक माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न लोकरंगमंच आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘रिंगण’च्या निमित्ताने केला आहे. स्थानिक भाषेत, आपल्या आसपासच्या कलाकारांनीच साकारलेले ‘रिंगण’ प्रेक्षकांना वास्तवाची जाणीव करून देते आहे.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांना ‘रिंगण’च्या शंभराव्या प्रयोगातून बुधवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह, अभिनेत्री रत्ना पाठक यांच्यासह मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, लेखक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा प्रयोग झाला. लेखक अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून ‘रिंगण’ साकारले आहे.
‘रिंगण’ ही विविध भागातील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या पथनाटय़ांची साखळी आहे. अंनिसच्या वर्धापनदिनाच्या दिवशी साताऱ्यातून सुरू झालेला रिंगणचा प्रवास शंभराव्या प्रयोगापर्यंत पोहोचला आहे. राज्यातील नऊ शहरांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील अंधश्रद्धेच्या समस्येवर, चुकीच्या प्रथांवर पथनाटय़ाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. अंनिसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच या पथनाटय़ाच्या संहिता, गाणी यांचे लेखन केले आहे. बुवाबाजी, वास्तूशास्त्र, भविष्य यांतील खोटेपणा, वैदूगिरीमुळे तयार झालेल्या समस्या, या सगळ्या प्रथांमधून स्त्रियांवर होणारे अत्याचार, नंदुरबारमधील डाकीण प्रथा यांसारख्या विविध मुद्दय़ांवर या पथनाटय़ांमधून प्रकाश टाकण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आल्यानंतर होऊ शकणारे बदल, त्याचा वापर याबाबतही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या पथनाटय़ाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
कोणताही बडेजाव नाही. आपल्या आजूबाजूला दिसणारे, आपलीच भाषा बोलणारे कलाकार.. कधीतरी आपण पाहिलेली, ऐकलेली किंवा प्रसंगी अनुभवलेली घटना. आणि या सगळ्याला फक्त ढोलकीची साथ. हे समीकरण लोकांना घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लावते. समोर मांडलेली गोष्ट, मांडलेला विचार शंभर टक्के पटला नाही, तरी ‘काय असेल’ हा विचार करायला प्रेक्षकाला भाग पाडते. यातच या रिंगणाचे यश सामावले आहे.