डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी प्लॅन्चेट वापर केल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यावर केल्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस महासंचालकांनी राज्य पोलिसांच्या नागरी हक्क संरक्षण विभागाकडे दिला आहे. त्यानुसार या विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. डी. मिश्रा हे या प्रकरणी चौकशी करीत आहेत.
या प्रकरणातील आरोप हे पुणे पोलिसांवरच असल्यामुळे या प्रकरणाचा तपास इतर तपास यंत्रणांनी करण्याची मागणी पुणे पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे केली होती. त्यानुसार हा तपास नागरी हक्क संरक्षण विभागाकडे दिला आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील राज्य अन्वेषण विभाग (सीआयडी) च्या कार्यालयात डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास केलेल्या काही अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत. नागरी संरक्षण विभागाकडून नोंदविण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, यामध्ये कोणाचे जबाब नोंदविले हे सांगण्यास अधिकाऱ्याने नकार दिला.
दरम्यान, डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले की, प्लॅन्चेट प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, एक महिना झाला तरी त्या समितीचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. या प्रकरणी पोलीस महासंचालाक, पुणे पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.
अंनिसकडून राज्यभर निर्दशने
अंनिसचे सर्व कार्यकर्ते डॉक्टरांवर गोळ्या झाडण्यात आलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर उद्या सकाळी (दि. २० ऑगस्ट) सव्वा सात वाजता जमणार आहेत. त्यावेळ पुलावर डॉक्टरांना अभिवादन करतील. त्यानंतर या ठिकाणाहून मोर्चा काढून मनोहर मंगल कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा जाईल. त्या ठिकाणी डॉक्टरांना अभिवादन केले जाईल. त्यानंतर दुपारी दोन ते सात दरम्यान रिंगण नाटय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बरोबर राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये अंनिसकडून निषेधाच्या सभा, मानवी साखळी, धरणे यांचे आयोजन करण्यता आले आहे. जिल्ह्य़ांबरोबरच प्रमुख महानगरे असलेली नाशिक, मुंबई, लातूर या ठिकाणी अंनिसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत, असे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.