मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना २००९ पासून सातत्याने बजावत आहे. त्यापुढे जाऊन आता नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची वाटचाल मनसेने सुरू केली आहे, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाची देशाला गरज असून माझे खासदार लोकसभेत मोदींनाच पाठिंबा देतील, असे विधान पुण्यातील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी सोमवारी केले. त्यावर महायुतीच्या पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे यांनी जोरदार टीका केली. शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, भाजपचे महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे, तसेच उज्ज्वल केसकर, राजेंद्र शिंदे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचे काम मनसेकडून २००९ पासून सुरू आहे आणि टोलसह सर्व मुद्यांवरून लोकांची दिशाभूल करूनदेखील काही साध्य होत नाही, हे लक्षात आल्यामुळे आता युतीबद्दल गैरसमज पसरवण्याचे उद्योग मनसेकडून सुरू आहेत. मला अटक करून दाखवाच असे जाहीर करत मनसेने टोलविरोधात जे आंदोलन केले त्या आंदोलनाने प्रत्यक्षात काहीही साध्य झाले नाही. त्यामुळेच गैरसमज पसरवण्याचे मनसेचे हे षडयंत्र आहे. प्रत्यक्षात युतीची ताकद वाढली आहे आणि आरपीआयमुळे महायुतीची ताकद व चाहता वर्गही वाढला आहे, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
शरद पवार यांनी मनसेचे कौतुक केल्याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात जिथे सरळ लढत आहे तेथे जे काही मनसेचे मतदार आहेत त्यांनी राष्ट्रवादीला मते द्यावीत, यासाठी त्यांनी केलेला हा डाव आहे.
 
शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी प्रचारात  
विश्वजित कदम यांच्या प्रचारावर टिप्पणी करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पुण्याच्या निवडणुकीत शिक्षण क्षेत्रातील मंडळींचे फार मोठे योगदान सध्या दिसत आहे. पुण्यात शिक्षण क्षेत्रातील मंडळींची निवडणुकीत तडफ दिसत असली, तरी हे काम वास्तविक राजकारणातील मंडळींचे आहे. ते काम त्यांनीच करावे.