12 December 2017

News Flash

विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवणार – डॉ. नितीन करमळकर

डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठाचा विस्तार खूप आहे, विद्यार्थिसंख्याही मोठी आहे.

प्रतिनिधी, पुणे | Updated: May 20, 2017 3:36 AM

डॉ. नितीन करमळकर

‘विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यांच्याशी संवाद साधून प्रश्न सोडवण्याचे आवाहन मी सगळ्याच विभागांना केले आहे. यापुढे कुलगुरूंना भेटता येत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार राहणार नाही,’ असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शुक्रवारी सांगितले.

डॉ. करमळकर यांनी कुलगुरुपदाची सुत्रे नुकतीच स्वीकारली. त्यानिमित्ताने त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, वित्त व लेखा अधिकारी डॉ. विद्या गारगोटे आदी उपस्थित होते.

डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठाचा विस्तार खूप आहे, विद्यार्थिसंख्याही मोठी आहे. अनेक विद्यार्थी बाहेरून विद्यापीठात शिक्षणासाठी येतात. विद्यार्थी सुविधा केंद्र, वसतिगृह, प्रमाणपत्रे मिळण्यासाठी होणारा विलंब अशा विद्यार्थ्यांच्या अडचणी, परीक्षा विभागाबाबतच्या तक्रारी यांची जाणीव मला आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याला माझे प्राधान्य राहील. विद्यार्थ्यांना भेट घेण्यासाठी ताटकळावे लागते असे चित्र दिसणार नाही. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन मी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही केले आहे. यापुढे कुलगुरू विद्यार्थ्यांसाठी २४ तास उपलब्ध असतील.’

महाविद्यालयांची स्वायत्तता, श्रेयांक मूल्यमापन पद्धती (क्रेडिट सिस्टिम) यांबाबत विचारले असता कुलगुरू म्हणाले, ‘स्वायत्तता मिळवण्यासाठी सक्षम असलेल्या महाविद्यालयांना ती मिळवण्यासाठी विद्यापीठाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयांमध्ये श्रेयांक मूल्यमापन पद्धती लागू करणे बंधनकारक आहे. वेगवेगळ्या शाखांचा, विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना एकावेळी करता यावा यासाठी आपल्याकडे श्रेयांक मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली आहे. महाविद्यालयांमध्येही ती लागू करण्यात येईल.’

First Published on May 20, 2017 3:36 am

Web Title: dr nitin karmalkar comment on students problem