ज्यांचे गाणे कानात साठवत आणि स्वरांचे तेज अनुभवत आले त्या डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या नावाने आणि त्यांच्याच हस्ते मिळालेला पुरस्कार ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणी आहे, अशी भावना प्रसिद्ध गायिका डॉ. अलका देव-मारुलकर यांनी रविवारी व्यक्त केली.
गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते डॉ. अलका देव-मारुलकर यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांच्या हस्ते डॉ. अत्रे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. मंजिरी धामणकर, नातू फाउंडेशनचे शारंग नातू, गानवर्धन संस्थेचे कृ. गो. धर्माधिकारी, प्रसाद भडसावळे या वेळी उपस्थित होते.
संगीताची जी साधना माझ्या हातून घडली त्याची पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली असल्याचे सांगून अलका देव-मारुलकर म्हणाल्या, स्वरांशी संवाद कसा साधावा हे मी प्रभाताई यांच्याकडून शिकले. हे माझे शिक्षण अधिकाधिक चांगले करता यावे अशा शुभेच्छा मला द्याव्यात.
डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, ज्येष्ठ कलाकार अशा स्थानी असल्याचे फायदे जसे असतात तशी त्या कलाकारावरची जबाबदारीदेखील वाढते. माझ्या संगीत जीवनातील वाटेवरील खुणा नव्या पिढीच्या कलाकारांना दिशा दाखवतील हा विश्वास आहे. कानसेन रसिकांची प्रतिनिधी म्हणून माझा या कार्यक्रमातील सहभाग असल्याची भावना विद्या बाळ यांनी व्यक्त केली.
धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. नातू आणि धामणकर यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. प्राची घोटकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या गायनाची मैफल झाली. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीची आणि भरत कामत यांनी तबल्याची साथसंगत केली.