गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे प्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर यांना यंदाचा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार जाहीर झाला आहे. ३१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते विजय कोपरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि शारदा ज्ञानपीठम्चे पं. वसंत गाडगीळ या वेळी उपस्थित राहणार आहेत. विजय कोपरकर यांना डॉ. मधुसूदन पटवर्धन, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उत्तरार्धात विजय कोपरकर यांच्या गायनाची मैफल होणार आहे. त्यांना राहुल गोळे संवादिनीची आणि श्रीकांत भावे तबल्याची साथ करणार आहेत, असे गानवर्धन संस्थेचे विश्वस्त प्रसाद भडसावळे आणि नातू फाउंडेशनचे शारंग नातू यांनी कळविले आहे.