News Flash

स्वररूपी ‘कटय़ार’ रसिकांच्या काळजात घुसली!

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने सांगता झाली.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची रविवारी सांगता झाली.

डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची सांगता

भर मध्यान्हीच्या ‘शुद्ध सारंग’ रागानंतर सादर झालेल्या ‘अवघे गर्जे पंढरपूर’ अभंगासह ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटातील गीत.. हृदयाला भिडणाऱ्या व्हायोलिनच्या सुरांतून सादर झालेली ‘वातापि गणपती भजेहं’ ही आदितालातील रचना आणि ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग.. पं. राजन आणि सारंग कुलकर्णी पिता-पुत्राचे बहारदार सरोदवादन.. ‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे आणि सुधाकर चव्हाण या किराणा घराण्याच्या गायकांच्या मैफली.. गायकी अंगाने झालेले उस्ताद शुजात खाँ यांचे सतारवादन.. सलग दहा तासांच्या स्वराभिषेकामध्ये न्हाऊन निघालेल्या ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने सांगता झाली. पं. सवाई गंधर्व यांच्या ‘भैरवी’चे सूर कानामध्ये साठवत रसिकांनी एकमेकांचा निरोप घेतला तो २०१८ मधील महोत्सवामध्ये भेटण्याचे आश्वासन देतच!

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये रविवारी अखेरच्या सत्रात रसिकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या संगीत नाटकातील भूमिकेसह याच नावाच्या चित्रपटासाठी केलेल्या पाश्र्वगायनामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेला युवा गायक महेश काळे यांच्या मैफलीने आजच्या सत्राचा प्रारंभ झाला. महेश काळे या नावाला लाभलेल्या वलयामुळे रसिकांनी सकाळपासूनच तिकीट खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. नवीन मराठी शाळेपासून रसिकांची सुरू झालेली रांग न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचली होती. शाळेच्या मैदानामध्ये रसिकांना सामावून घेण्याची क्षमता ध्यानात घेता काही मोजक्याच दैनंदिन तिकिटांची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे अनेक रसिकांना विन्मुख परतावे लागले.

‘शुद्ध सारंग’ रागाच्या बंदिशींनंतर महेश काळे यांनी ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हा अभंग भक्तिभावाने सादर करीत आपले गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांना अभिवादन केले. माउली टाकळकर यांच्या टाळवादनाने या अभंगगायनामध्ये अनोखे रंग भरले गेले. तराण्यासह ‘कटय़ार काळजात घुसली’ हे गीत सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली तेव्हा उभे राहून टाळ्यांचा गजर करीत रसिकांनी महेश काळे यांना उत्स्फूर्त दाद दिली. गायकी अंगाने वादन करणाऱ्या पद्मा शंकर यांच्या व्हायोलिनवादनाने रसिकांनाजिंकले. ‘अभिजात संगीत समृद्ध आणि संपन्न आहे. हिंदूुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत या संगीत वृक्षाच्या दोन शाखा आहेत’, या त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेची प्रचिती त्यांच्या वादनातून आली.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य सुधाकर चव्हाण यांच्या गायनाची मैफल झाली. त्यानंतर पं. राजन आणि सारंग कुलकर्णी या पिता-पुत्राचे सरोद सहवादन झाले. किराणा घराण्याचे आनंद भाटे यांनी ‘यमनकल्याण’ रागानंतर ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या अभंग गायनाने मैफलीची सांगता केली. रसिकांनी ‘वन्स मोअर’ची मागणी केली. ‘थोडक्या वेळात चांगले गाणे झाले पाहिजे’ ही पं. भीमसेन जोशी यांची शिकवण आहे. ती आचरणात आणण्याचा मी प्रयत्न केला. मी पुन्हा आपल्या सेवेत येईन’, अशा शब्दांत आनंद भाटे यांनी रसिकांशी संवाद साधला. उस्ताद शुजात खाँ यांच्या बहारदार सतारवादनाने रसिकांच्या काळजाची तार छेडली. ‘झिंझोटी’ रागाचे सौंदर्य उलगडल्यानंतर त्यांनी एक गज़्‍ाल आणि उत्तर प्रदेशातील लोकगीत गायनासह सादर केले. ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सुरेल सांगता झाली. सवाई गंधर्व यांचे सूर हृदयात साठवीत रसिकांनी महोत्सवाचा मंडप सोडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:42 am

Web Title: dr prabha atre in sawai gandharva bhimsen festival
Next Stories
1 या रे नाचू अवघे जन भावे प्रेमे करून
2 ‘लोकसत्ता’च्या वार्ताहरास मारहाण करणाऱ्या नीलेश मोरे यांची पोलीस कारकीर्द वादग्रस्तच
3 शिक्षण आणि न्यायव्यवस्थेत बदलासाठी आराखडा आवश्यक
Just Now!
X