03 December 2020

News Flash

डॉ. शोभना गोखले यांचे निधन

पुराभिलेख आणि नाणकशास्त्र या विषयांत संशोधन आणि लेखन करणाऱ्या तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले (वय ८५) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले.

| June 23, 2013 02:50 am

पुराभिलेख आणि नाणकशास्त्र या विषयांत संशोधन आणि लेखन करणाऱ्या तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले (वय ८५) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. शोभना गोखले यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शोभनाताई या मूळच्या सांगलीच्या. अमरावती येथे त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. पत्रकार ल. ना. गोखले यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या पुण्यात आल्या. पीएच. डी. संपादन केल्यानंतर त्या १९६० मध्ये डेक्कन कॉलेज येथे लिपिशास्त्रज्ञ आणि व्याख्याता म्हणून रुजू झाल्या. संस्कृत आणि इतिहास या आवडीच्या विषयामंध्ये अखेपर्यंत रमलेल्या शोभनाताईंनी अनेकांना या विषयांच्या अभ्यासाची दिशा दिली. स्त्रिया फारशा घराबाहेर पडत नसत अशा काळामध्ये ठिकठिकाणी पायी फिरून त्यांनी शिलालेखांचा शोध घेतला. या शिलालेखांचा अभ्यास करीत त्यांनी दुर्मिळ माहिती संकलित केली आणि ज्ञानाचा खजिना सर्वासाठी खुला केला. १९७४ मध्ये त्यांनी कान्हेरी येथील २६ शिलालेख शोधून त्याआधारे महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांचे १५० हून अधिक शोधनिबंध, ‘पुराभिलेखविद्या’ आणि ‘भारतीय संस्कृतिवैभव’ यांसह दहाहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सदस्य, भारतीय इतिहास संशोधन मंडळ आणि अखिल भारतीय नाणकशास्त्र परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
रांजणगावजवळ दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील नाणी सापडली. तेव्हा केवळ आठ दिवसांत शोभनाताईंनी या नाण्यांचा अभ्यास केला होता. वाशिमजवळील शिलालेख, जुन्नर येथे मिळालेल्या सातवाहनकालीन नाण्यांचे वाचन केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील लेखांचे पुनर्वसन करीत त्यांनी नवा सिद्धांत मांडला. मुंबईजवळच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये लपलेल्या बौद्ध गुंफा शोधून काढल्या आणि तेथील शिलालेखांचे वाचन केले. नाणेघाट आणि पैठणकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर मिळालेल्या ब्राह्मी लिपीतील शिलालेखांचे वाचन करून व्यापारी संबंधांवर प्रकाश टाकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 2:50 am

Web Title: dr shobhana gokhale is passed away
Next Stories
1 खोटा ई-मेल पाठवून पुण्यातील व्यापाऱ्याची ४६ लाखांची फसवणूक
2 चित्रपटांच्या नव्या चळवळीला हवे प्रेक्षकांचे पाठबळ
3 पुणे विद्यापीठाच्या परीक्षांसाठी बारकोड लागू करणार
Just Now!
X