X
निवडणूक निकाल २०१७

नामवंतांचे बुकशेल्फ : लोकशिक्षणासाठी वाचनासोबत लेखनाचा मार्ग

इतिहासाची आवड असल्याने त्याविषयीची पुस्तके माझ्या वाचनात होतीच.

डॉ. श्रीकांत परांजपे (संरक्षणशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक)

आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा हे माझे आवडते विषय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ येथून शिक्षण घेत मी राज्यशास्त्रासह इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांचे सखोल ज्ञान संपादन केले. संशोधन प्रबंधाच्या माध्यमातून अनेक विषयांवर अभ्यास करीत केलेले संशोधन केवळ माझ्यापुरते मर्यादित न ठेवता मी केलेल्या वाचनाचा उपयोग लेखनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पुस्तक लेखन आणि विविध वृत्तपत्रांमध्ये लेखनाच्या माध्यमातून लोकशिक्षणासाठी आजही मी कार्यरत आहे.

घरामध्ये माझी आई (कुमुद) आणि वडील (भालचंद्र) यांना वाचनाची आवड होती. बाबा ब्रिटिश कौन्सिलचे सभासद असल्याने घरामध्ये पुस्तके नियमितपणे येत असत. मात्र, मला लहानपणी वाचन आणि पुस्तकांपेक्षा खेळणे जास्त आवडत होते. त्यामुळे माझ्या वाचनप्रवासाची सुरुवात अगदी लहानपणी नाही, तर शाळेमध्ये इयत्ता सातवी-आठवीच्या सुमारास झाली, तीही बाबांमुळेच. त्यांनी इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन करण्यास मला प्रवृत्त केले आणि संपादकीय पानाच्या वाचनाने माझ्या वाचनाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वर्तमानपत्रामधील सदरांचे वाचन करताना अडलेले शब्द हे डिक्शानरीमधून शोधायचे आणि ते लिहून काढण्याची सवय मला बाबांमुळेच जडली. माझ्या वाचनाचा तो पाया होता. त्यामुळे आज स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांचे ज्ञान मिळविणे मला सहजगत्या शक्य होते. आता मागे वळून पाहताना वर्तमानपत्र वाचनाचे झालेले अनेक फायदे माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात.

सेंट हेलेनाज्, दस्तूरसारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनंतर स. प. महाविद्यालय आणि फग्र्युसन महाविद्यालयात माझे शिक्षण झाले. महाविद्यालयात असताना कादंबरी वाचन मोठय़ा प्रमाणात होत होते. त्यात इतिहासाची आवड असल्याने त्याविषयीची पुस्तके माझ्या वाचनात होतीच. लहानपणापासूनच इंग्रजी माध्यमामध्ये माझे शिक्षण झालेले असल्याने मराठी साहित्याच्या वाचनाशी फारसा जवळचा संबंध आला नाही. मराठी, िहदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांच्या एकत्रित शिक्षणाने मला एका भाषेवर प्रभुत्व मिळविणे शक्य झाले नाही, ही खंत मनात कायम आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (युपीएससी) या वाटेने न जाता शिक्षकी पेशाची निवड करून अध्यापनाचा मार्ग स्वीकारायचा हे मी ठरविले होते. आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांचा अभ्यास करताना अनेक इंग्रजी पुस्तकांचे वाचन झाले. सन्यदलातील वरिष्ठ सेनाधिकारी आणि त्याविषयीचा अभ्यास करणाऱ्यांनी एकत्रितपणे बसून विचार करायला हवा, तरच त्या विषयीची व्यापकता समजून घेणे शक्य होऊ शकेल, असे मला आज माझ्या वाचन आणि अभ्यासाच्या आधारे वाटते.

माझ्या वाचनप्रवासात गुन्हे, सामाजिक, ऐतिहासिक आणि संरक्षण या विषयांच्या साहित्याचा मोठय़ा प्रमाणात अंतर्भाव होता. तर, विविध आत्मचरित्रांच्या वाचनामुळे माझ्या ज्ञानात भर पडत गेली. भारताचा इतिहास, हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया, पंडित नेहरुंचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या लेखनातून त्यांचे विचार जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी, जयकर ग्रंथालय, गोखले इन्स्टिटय़ूट या ठिकाणी मी सातत्याने जात असे. अभ्यासाशी निगडित वैविध्यपूर्ण साहित्य मला येथे मिळत गेले. या काळात नियतकालिकांची वाचनाची गोडी मला लागली. आजही मराठी व इंग्रजी वर्तमनापत्रांचे वाचन केल्याशिवाय मला चन पडत नाही. आमच्या घरामध्ये तब्बल चार कपाटे भरुन पुस्तके होती. त्यातील अनेक पुस्तके माझ्या विद्यार्थ्यांना मी दिली आहेत.

अमेरिकेमध्ये गेलो असताना तेथून क्रेट भरभरुन पुस्तके मी आणली होती, तर अनेकांकडून त्यांच्या संग्रहातील दुर्मीळ पुस्तके मला मिळाली. त्यामुळे माझ्या पुस्तक संग्रहात भर पडत गेली. शिक्षकी पेशा निवडल्यानंतर विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांशी संबंध आला. भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल विद्यार्थ्यांशी बोलताना अनेकदा पंडित नेहरु, कृष्ण मेनन यांनी केलेल्या लेखनाचे संदर्भ माझ्या वाचनामुळे मला उपयोगी पडले. तर, अमेरिकन उत्क्रांती, रशियन उत्क्रांतीबद्दल अनेक चित्रपटांची उदाहरणे देता आली. त्यासंबंधीची कोणती पुस्तके वाचावी, याचे मार्गदर्शन मी विद्यार्थ्यांना करू शकलो, ते माझ्या वाचनामुळेच. वाचनासोबतच लेखनही करायला हवे, असे मला गुजरात विद्यापीठातील प्रवीण शेठ यांनी सांगितले. मी केलेले संशोधन, अभ्यास आणि विचार इतरांपर्यंत पोहोचवावे, यासाठी १९७९ मध्ये वृत्तपत्रीय लेखनाला सुरुवात केली. लोकशिक्षण हे महत्त्वाचे असून आपले ज्ञान इतरांच्या उपयोगी पडावे, हाच यामागचा उद्देश होता. अभ्यासाव्यतिरिक्त इंग्रजीमध्ये अन्य लेखकांची पुस्तके मी वाचली. इरावती कर्वे, गो. नी. दांडेकर यांचे साहित्य वाचले.

इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारची नियतकालिके मी आजही शोधत असतो. प्रत्येक क्षणाला वाढणाऱ्या ज्ञानाच्या सागरातून विचारांचे मोती वेचण्याचा प्रयत्न इंटरनेटच्या माध्यमातून सुरूच असतो. मात्र, किंडल किंवा मोबाइलवर पुस्तके वाचणे मला फारसे आवडत नाही. त्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तके विकत घेऊन वाचणे मी पसंत करतो. अनेकदा आमच्या मित्रमंडळींमध्ये पुस्तकांचे आदानप्रदान होत असते. त्यातूनही वेगवेगळ्या धाटणीची पुस्तके वाचण्याची संधी मिळते. वाचन हे आपली भाषा सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे. वाचनाने आपला दृष्टिकोन व्यापक होतो. त्याचप्रमाणे ज्ञानामध्ये नवनवीन गोष्टींची भर पडते. त्यामुळे विविध प्रकारची पुस्तके वाचण्याचा छंद प्रत्येकाने जोपासायला हवा.

Outbrain