इतिहास केवळ कागदपत्रांत नसतो, तर तो चित्रांतही असतो. चित्रांमधून त्या काळाची प्रगल्भता, तंत्रज्ञान, सामाजिक परिस्थितीही समजते. त्या दृष्टीने चित्रे ही इतिहासाचे दृश्यमय दस्तावेजीकरण आहे, असे मत मांडत ज्येष्ठ चित्रकार, पुरातत्त्व आणि कलाइतिहासतज्ज्ञ डॉ. श्रीकांत प्रधान यांनी चित्रांच्या संवर्धनाची गरज व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दुर्मीळ चित्रांची स्थिती ‘मराठेशाहीपासूनचा दुर्मीळ चित्रठेवा धूळ-बुरशीत खितपत’ या वृत्ताद्वारे ‘लोकसत्ता’ने उजेडात आणली. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेऊन चित्रांच्या जतनाचे आदेश दिले. तसेच मार्चपर्यंत त्याबाबतचे काम करून खास दालन करण्याची सूचनाही केली आहे. या पाश्र्वभूमीवर चित्रांच्या जतन संवर्धनाचा विषय चर्चेत आला आहे.

डॉ. प्रधान म्हणाले, ‘अनेक व्यक्ती, संस्थांकडे जुनी चित्रे असतात. ही चित्रे जपण्यासाठी विशेष प्रयत्न किंवा फारसा खर्च करण्याची गरज नसते. थोडी काळजी घेतल्यास चित्रांचे जतन सहजशक्य आहे. त्यासाठी चित्र कुठे लावले किंवा ठेवले जाते ते सर्वात महत्त्वाचे आहे. जास्त उष्णता, दमट किंवा ओलसर अशा जागी चित्र असल्यास ते खराब होते. चित्रांवर बुरशी, डाग पडले आहेत का हेही वेळोवेळी तपासले पाहिजे.’

जुन्या चित्रांचे, कागदपत्रांचे जतन, संवर्धनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जुने चित्र कापड, कॅनव्हास, लाकूड, दगड कोणत्याही पृष्ठभागावर काढलेले असू शकते. त्यामुळे ते कोणत्या काळात काढलेले आहे, कोणत्या प्रकारचे रंग वापरले आहेत हे समजून घ्यावे लागते. तसेच प्रत्येक चित्राचा, रंगाचा पोत लक्षात घ्यावा लागतो. त्यामुळे खराब झालेल्या चित्रांना वाचवण्यासाठी काही वेळा रासायनिक प्रक्रिया, आवश्यकतेनुसार जोडकाम (पॅचिंग) करावे लागते. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही चित्रांच्या संवर्धनात उपयोग केला जातो. परदेशात मोनालिसाचे चित्र इतक्या वर्षांनंतरही जपले जाते हे लक्षात घेऊन आपल्याकडे असलेली जुनी चित्रे खराब होऊच नयेत म्हणून किमान कलाभान आवश्यक आहे, असेही डॉ. प्रधान यांनी सांगितले.

म्हणून विद्यापीठातील चित्रे महत्त्वाची..

जेम्स वेल्स हा स्कॉटिश चित्रकार अत्यंत महत्त्वाचा होता. त्याने पेशव्यांसह अनेकांची चित्रे काढली होती. तो बराच काळ पुण्यात राहिला असल्याने त्याच्या चित्रकलेमुळे पुण्यात एक प्रकारे प्रभाव निर्माण होऊन पुढे काही चित्रकार घडले. म्हणूनच विद्यापीठाकडे असलेल्या चित्रठेव्याचे मूल्य फार मोठे आहे, असेही डॉ. प्रधान म्हणाले.

मराठेशाहीच्या चित्राचा रंजक इतिहास

– जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराने काढलेले मराठेशाहीचे चित्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कसे आले, याची कहाणी रंजक आहे.
– ‘जेम्स वेल्स : आर्टिस्ट अ‍ॅण्ड अ‍ॅण्टीक्वारियन इन द टाइम ऑफ पेशवा सवाई माधवराव’ या पुस्तकात इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक उदय कुलकर्णी यांनी त्या विषयी लिहिले आहे.
– जेम्स वेल्स हा स्कॉटिश चित्रकार १७९१ मध्ये भारतात आला. त्यानंतर १७९३-९४च्या सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे सुमारास ‘द मराठा एम्पायर’ या नावाचे हे चित्र वेल्सने चितारले. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर हे चित्र मुंबईच्या तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरच्या कार्यालयात नेल्याची शक्यता आहे.
– १८६५ मध्ये फ्रेड्रिक लुईस या चित्रकाराने हे चित्र टचअप केल्याची नोंद आहे. पुढे १९२५ मध्ये इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्डस कमिशन मीटिंगसाठी हे चित्र पुण्यात आणले गेले. नंतर ते गव्हर्नर बंगल्यात ठेवण्यात आले.
– पुढे पुणे विद्यापीठासाठी ही ब्रिटिशकालीन वास्तू देण्यात आल्यावर ते चित्र विद्यापीठाकडे आले.