डॉ. श्रीपाल सबनीस यांची अपेक्षा
कविता ही काही ठरवून होत नसते. जगण्यातील दु:ख, विरह आणि जगण्यातील अनुभवातून जशी कविता सुचते तशीच ती हळुवार आणि उत्कट प्रेमातूनही सुचते. मात्र, त्या कवितेमध्ये मानवी संस्कृतीची प्रामाणिकता असावी, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी व्यक्त केली.
उचित माध्यम प्रकाशित हरीश तारू यांच्या ‘बिनवासाचा चाफा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध कवयित्री डॉ. संगीता बर्वे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रकाशक रेश्मा जीवराज आणि हनुमंत जगनगडा या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात हरीश तारू आणि अभिजित थिटे यांनी कविता सादरीकरण केले. सबनीस म्हणाले, केवळ प्रेमालाच नव्हे तर विरहालाही गंध असतो. प्रेम ही केवळ नैसर्गिक भावना नाही, तर प्रेम हे मूल्य आहे. जीवनामध्ये आलेले अनुभव, बसलेले चटके, जातिभेदाच्या भिंतीने केलेले आघात याचे प्रतििबब ‘बिनवासाचा चाफा’ कवितासंग्रहामध्ये आहे. एका अर्थाने ‘सैराट’ चित्रपटाची समकालीन काव्यसंहिता म्हणून या संग्रहाकडे बोट दाखवता येईल. जगण्यातील वेदना, प्रेमातून आलेला विरह याबरोबरच समाजातील विविध प्रश्नदेखील कवितेतून मांडले जावेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2016 1:24 am