एका विलक्षण ताकदीच्या माणसाबरोबर मला माझे चित्रपटातील पहिले काम करता आले. व्ही. शांताराम यांना भेटताच मीही व्ही. शांतारामवादी झालो. दम देऊन त्यांनी माझ्याकडून काम करून घेतले. पण, त्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभावच माझ्यावर इतका पडला, की सहसा न केली जाणारी गोष्ट माझ्या हातून घडली. मी चक्क खाली वाकून त्यांच्या पाया पडलो. मी फारच थोडय़ा लोकांना वाकून नमस्कार केला असेल. त्यामध्ये व्ही. शांताराम होते. अर्थात त्यांची ती ताकद होती. त्यामुळे शांतारामबापूंच्या पाया पडलो याचे मला दु:ख नाही.. असा आठवणींचा सुखद पट उलगडला नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मैलाचा दगड समजला गेलेला.. व्ही. शांताराम दिग्दर्शित डॉ. श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या अभिनयाने नटलेला.. जगदीश खेबुडकर यांची गीते, राम कदम यांचे संगीत, उषा मंगेशकर, सुधीर फडके, लता मंगेशकर यांच्या पाश्र्वगायनाने अजरामर झालेला.. ‘पिंजरा’ या चित्रपटाचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. नव्या रंगातील आणि नव्या ढंगातील हा चित्रपट १८ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. व्ही. शांताराम यांचे पुत्र किरण शांताराम यांनी डॉ. श्रीराम लागू आणि ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम यांच्या उपस्थितीत ही माहिती दिली. ‘पानिपत’कार विश्वास पाटील, डिजिटायझेशनचे काम करणारे पुरुषोत्तम लढ्ढा, प्रियदर्शिनी पाटील, संगीतकार अमर-विश्वजित जोडीतील विश्वजित जोशी या वेळी उपस्थित होते.
‘पिंजरा’ या नावापासूनच माझा चित्रपटाला विरोध होता. पिंजरा असे म्हणताना आम्ही काम करणारे सगळे काय जनावर आहोत का?, अशी भावना सुरुवातीला माझ्या मनात होती. पण, चित्रीकरण जसजसे होत गेले, तेव्हा माझा मूर्खपणा मलाच समजत गेला. हा पिंजरा लाकडाचा किंवा लोखंडाचा नाही तर, माणसाच्या जाणिवेचा पिंजरा आहे. या पिंजऱ्यात माणूस कसा उत्कृष्टपणे सापडू शकेल हे पाहण्यात आले आहे, अशा शब्दांत लागू यांनी पिंजरा चित्रपटाचे वैशिष्टय़ सांगितले.
मी नट आहे. त्यामुळे चित्रपटात काम मिळावे ही अपेक्षा असणार यात दुमत नाही. त्याच अपेक्षेने मी व्ही. शांताराम यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो, तेव्हा त्यांनी माझ्याकडे गमतीने पाहिले. जणू हा माणूस स्वत:ला नट समजतोय असा काहीसा माझा आविर्भाव असावा अशी त्यांची धारणा झाली असेल. मात्र, काहीही माहिती नसताना ते माझ्याशी अर्धा तास बोलत होते. ‘एकाही चित्रपटात काम न करता तुम्ही मला काम द्या, असे थेट मलाच सांगता,’ असे म्हणत शांतारामबापूंनी माझी पहिल्याच वाक्यात विकेटच घेतली. पण, या गप्पांमध्ये त्यांनी माझ्यातील नट जागा केला. या चित्रपटात मी जे काही काम केले इतपत बरे काम करता येईल, असे मलासुद्धा वाटले नव्हते. काही दृश्यांमध्ये मी स्वत:च ठीकपणे काम करत नव्हतो. पण, ‘तुम्हीच या सिनेमात काम करणार आहात,’ असे सांगत शांताराम यांनी माझ्यातील नटाला जागे केले. त्यांचा माझ्यासारख्या नवख्या कलाकारावरचा विश्वास पाहून माझी अवस्था भारावून गेल्यासारखीच झाली होती. मी काम करेपर्यंत माझी मराठी चित्रपटांविषयीची मते फारशी चांगली नव्हती. पण, अशी माणसं आहेत तोपर्यंत मराठी चित्रपटाला मरण नाही, असे वाटले, असेही डॉ. लागू यांनी सांगितले.