संस्कृत भाषा-वाङ्मय आणि बौद्ध संस्कृत तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना साहित्य अकादमीचा ‘भाषा सन्मान’ जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वैदिक संस्कृत, अभिजात संस्कृत, बौद्ध संस्कृत (तंत्र मार्ग) या कार्यक्षेत्रातील भाषाविषयक योगदानासाठी बहुलकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे साहित्य अकादमीतर्फे गुरुवारी कळविण्यात आले. अनपेक्षिपणे पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद असल्याची भावना डॉ. बहुलकर यांनी व्यक्त केली. अशा स्वरूपाच्या पुरस्काराबद्दल मला विचारणा झाली नव्हती, त्याचप्रमाणे मी अर्जदेखील केला नव्हता. साहित्य अकादमीच्या पुरस्कार निवड समितीच्या निकषामध्ये माझे काम बसले असावे, त्यामुळेच हा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराबद्दल साहित्य अकादमीच्या निवड समितीचे धन्यवाद, असेही बहुलकर यांनी सांगितले. बौद्ध संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास करणारे देशात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे उरले आहेत. या वाङ्मयाचे अध्ययन आणि अध्यापन करण्याच्या कार्याची दखल घेतली गेली याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. श्रीकांत बहुलकर हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव म्हणून कार्यरत आहेत.