News Flash

डॉ. सदानंद मोरे यांच्या उमेदवारीला डॉ. श्रीपाल सबनीस यांचा पाठिंबा

राजकीय निवडणुकीतील सत्तास्वार्थ आणि स्पर्धा सांस्कृतिक विश्वात नसावी, अशी भूमिका घेत ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डॉ. सदानंद मोरे यांच्या उमेदवारीला गुरुवारी पाठिंबा दिला.

| August 29, 2014 03:05 am

राजकीय निवडणुकीतील सत्तास्वार्थ आणि स्पर्धा सांस्कृतिक विश्वात नसावी, अशी भूमिका घेत ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या उमेदवारीला गुरुवारी पाठिंबा दिला. मी सांस्कृतिक विवेकाची पेरणी करतो आहे, असे सांगून सबनीस यांनी अध्यक्षपदासाठी इच्छुक अन्य उमेदवारदेखील या निर्णयाचे अनुकरण करतील, अशी अपेक्षा सबनीस यांनी व्यक्त केली.
घुमान येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. मोरे हे उमेदवार असतील तर त्यांना माझा पाठिंबा असेल, असे जाहीर करून मी १२ जुलै रोजी उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत महाराष्ट्राला शब्द दिला होता. त्या सांस्कृतिक वचनाचे पालन करीत असल्याचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. डॉ. मोरे हे केवळ संत तुकाराममहाराज यांचे वंशज नाहीत, तर आयुष्यभर संतसाहित्याचा अभ्यास करणाऱ्या मोरे यांचा अधिकार माझ्या तुलनेत मोठा आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी मोरे यांचे नाव येताच मी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आहे. या कृतीतून मी महाराष्ट्रावर, मोरे यांच्यावर किंवा साहित्य महामंडळावर उपकार करीत नाही.
या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अन्य साहित्यिकांनी पाठिंबा जाहीर करून मोरे यांची संमेलनाध्यक्षपदी बिनविरोध निवड करावी, असे आवाहनही सबनीस यांनी केले.
सबनीस यांच्या उमदेपणाबद्दल अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो, असे डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष निवडणुकीचे राजकीयकरण होऊ नये ही त्यांची सद्भावना आहे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 3:05 am

Web Title: dr sripal sabnis supports dr sadanand more
टॅग : Dr Sadanand More
Next Stories
1 बालभारती तयार करणार टॉकिंग बुक्स
2 स्वारगेट परिसराचा ‘बीओटी’वर एकात्मिक विकास
3 विजय निश्चित; गहाळ राहू नका – उद्धव ठाकरे
Just Now!
X