पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरीत उल्लेख करून त्यांच्यावर टीका करणारे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी ‘मॉर्निक वॉक’ करीत सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांना उत्तर दिले. पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळा एवढे अंतर ते पायी चालत गेले.
मोदींवर केलेल्या टीकेनंतर पुनाळेकर यांनी ट्विटरवरून ‘मॉर्निग वॉकला जात चला’ असा सल्ला श्रीपाल सबनीस यांना दिला होता. त्यावरून मोठा वाद झाला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या ते सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडल्यानंतरच झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर पुनाळेकर यांचे हे ट्विट म्हणजे सबनीस यांना दिलेली धमकीच आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली होती. त्या पाश्र्वभूमीवर सोमवारी हा मॉर्निग वॉक काढण्यात आला होता.
सोशालिस्ट पार्टी, राष्ट्र सेवा दल, आरोग्य सेना, सोशालिस्ट युवजन सभा, सोशालिस्ट महिला सभा, समाजवादी अध्यापक सभा, लोकायत आणि पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सकाळी आठ वाजल्यापासूनच महात्मा गांधी पुतळ्यापाशी थांबले होते. पोलीस संरक्षणासह सबनीस हे रिक्षाने तेथे पोहोचले. त्यानंतर ‘पुनाळकरांचा धिक्कार असो’, ‘मुस्कटदाबी नाही चालणार’ असे फलक झळकावत आणि सनातन संस्थेच्या निषेधाच्या घोषणा देत सबनीस कार्यकर्त्यांसमवेत आंबेडकर पुतळ्यापर्यंत पायी चालत गेले.