अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशीद एकाच ठिकाणी असावी हा विचार आपल्याला मान्य नाही. मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना, पूजा होते. मशीद ही केवळ नमाज पठण करण्यासाठी असते. मशिदीसाठी दुसरी जागा देता येणे शक्य आहे, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर होणारच असे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. भाजपच्या तीन जाहीरनाम्यांमध्ये मंदिर निर्माणाचे आश्वासन देण्यात आले असून हे मंदिर केव्हा उभारले जाईल, असा प्रश्न विद्यार्थ्यांने विचारला. पुढच्या जाहीरनाम्यापूर्वीच मंदिराची उभारणी झालेली असेल, असे स्वामी यांनी सांगितले.
स्वामी म्हणाले,की शरयू नदीच्या पलीकडे मशिदीसाठी जागा शोधली जात आहे. मशिदीच्या मोतवल्लीनेही मंदिर निर्माणास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. नमाज पठण कोठेही करता येऊ शकते. मशीद ही त्यासाठीची सुविधा असल्याचा न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला त्यांनी दिला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे राम मंदिराची उभारणी केली जावी, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मुस्लीमधर्मीयसुद्धा मंदिर उभारणीला पाठिंबा देतील अशी आशा आहे.