06 March 2021

News Flash

डेंग्यूला रोखण्यासाठी ड्रॅगन, किवी फळांचा ‘डोस’

इतर फळांच्या तुलनेते किमती जास्त असूनही डेंग्यूच्या भीतीने या फळांना पुणे, मुंबई, ठाण्यात मागणी वाढली आहे.

इतर फळांच्या तुलनेते किमती जास्त असूनही डेंग्यूच्या भीतीने या फळांना पुणे, मुंबई, ठाण्यात मागणी वाढली आहे. ‘रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण वाढते’ अशा आशयाचे संदेश समाज माध्यमांमधून फिरत असल्यामुळे किवी आणि ड्रॅगन फ्रूट ही परदेशी फळे सध्या भाव खात आहेत. वर्षभरापेक्षा गेल्या काही आठवडय़ांत या फळांसाठी तिप्पट मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

गेले काही आठवडे राज्यात मोठय़ा प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण मिळाले आहेत. डेंग्यू झाल्यावर रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. मात्र किवी आणि ड्रॅगन फ्रूट ही फळे खाण्यामुळे प्लेटलेट्सही संख्या एकदम वाढते, डेंग्यू बरा होतो, या फळांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता सर्वाधिक आहे,’ अशा आशयाचे संदेश समाज माध्यमांवर फिरू लागले. डेंग्यूची साथ सुरू असताना फिरणाऱ्या या संदेशांमुळे बाजारात या फळांची चौकशी ग्राहकांकडून सुरू झाली. या फळांसाठीच्या मागणीत गेल्या काही आठवडय़ात तिपटीने वाढ झाली असल्याचे फळ  विक्रेते सांगतात. पुण्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात या फळांचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांनीही मागणी वाढल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. काही महिन्यांपूर्वी मोठी दुकाने, मॉल्स येथेच मिळणारी ही फळे आता अगदी छोटय़ा फळ विक्रेत्यांनीही उपलब्ध करून दिली आहेत. रुग्णालयांबाहेर दुकाने असलेले विक्रेते आवर्जून ही फळे ठेवत आहेत. काही आठवडय़ापर्यंत एखादी पाटी विकत घेणारे छोटे विक्रेते आता ३ ते ४ पाटय़ा विकत घेऊ लागल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. याबरोबरच मोसंबी, पपई आणि डाळिंब या फळांना देखील सध्या मागणी आहे.

या फळांचे उगम स्थान काय

किवी – किवी या फळाला ‘चायनीज गूजबेरी’ असेही म्हणतात. इटली, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चिली, ग्रीस या देशांमध्ये या फळांचे प्राधान्याने उत्पादन होते.

ड्रॅगन फ्रूट – हे निवडुंगातील एका जातीला येणारे फळ आहे. मेक्सिको, दक्षिण अमेरिका, इस्राईल, ऑस्ट्रेलिया, नैर्ऋत्य आशियातील देशांत प्रामुख्याने या फळाचे उत्पादन होते. भारतातील शेतक ऱ्यांकडूनही आता या फळाचे पीक घेतले जाते.

किमती जास्त तरीही मागणी

किवी किंवा ड्रॅगन फ्रूट या दोन्ही फळांचे उत्पादन आता भारतात होत असले, तरी मुळात ती परदेशी फळे आहेत. अजूनही ही फळे परदेशातूनच अधिक प्रमाणात येतात. किवी हे फळ आपल्याकडील वातावरणात तुलनेने लवकर खराब होते. तीन ते चार दिवसांत ही फळे खराब होतात. यामुळे या फळांच्या किमती मिळणाऱ्या फळांपेक्षा जास्त आहेत. सध्या पुण्यात किरकोळ विक्रेत्यांकडे किवीचा एक खोका ८० ते ९० रुपयांना आहे. त्यात ३ किंवा ४ फळे असतात. ड्रॅगन फ्रूट साधारण २५० ते ३०० रुपये किलो आहे. एका किलोत ४ ते ५ फळे येतात.

या फळांनी प्लेटलेट्स वाढतात याबद्दल शास्त्रीय संशोधन नाही. जागतिक स्तरावर खूप मोठय़ा संख्येने व वेगवेगळ्या आजारांबाबत त्याच्या चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हा ‘मार्केटिंग’चा प्रकार दिसतो. शिवाय प्लेटलेट वाढवणे हे डेंग्यूच्या उपचारांचे उद्दिष्ट नसते. डेंग्यूच्या विषाणूंच्या शरीरावरील परिणामांचे ‘प्लेटलेट काउंट’ हे निदर्शक असते. ही फळे खाऊन प्लेटलेट काउंट जरी वाढला तरी डेंग्यूच्या विषाणूवर त्याचा परिणाम होत नाही. प्लेटलेट वाढवण्यासाठीची औषधे घेतल्यामुळे नुसता ‘प्लेटलेट काउंट’ वाढून मूळ विषाणूच्या परिणामांबद्दल खरी माहिती न मिळण्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– डॉ. अविनाश भोंडवे, फिजिशियन

या फळांमुळे प्लेटलेट वाढतात का, याबद्दल सांगता येणार नाही. परंतु डेंग्यू व चिकुनगुनियाच्या तापात ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वे असलेल्या कोणत्याही फळांचा एकूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने उपयोग होऊ शकतो. ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या फळांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स असतात.
– डॉ. वैशाली जोशी, आहारतज्ज्ञ

किवी, ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढली आहे. यापूर्वी ही फळे आम्हाला अनेकदा फेकून द्यावी लागली आहेत. मात्र आता अधिक प्रमाणात खरेदी करावी लागतात. सध्या विक्रेते ही फळे विकतही घेत नसत. आता  तीन किंवा चार खोके खरेदी करतात.’’

– विनायक काची, किसन सीताराम अँड ब्रदर्स, गुलटेकडी, मार्केटयार्ड

राज्यातील काही भागांत आम्ही फळे पुरवतो. मात्र प्राधान्याने मुंबई आणि ठाण्यात या फळांचा पुरवठा करतो. गेल्या आठवडय़ात किवी आणि ड्रॅगन फ्रूटला मुंबई आणि ठाण्यातून अधिक मागणी होती. वर्षभराच्या तुलनेत सध्या मागणी जास्त आहे.’’

– सलमान खान, एस. आय. के. फ्रूट कंपनी

मी तेरा वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटचे पीक घेतो आहे. पूर्वी हे फळ काय आहे ते मला लोकांना सांगावे लागायचे. आता राज्यभरातून मागणी वाढली आहे. गेल्या काही महिन्यात मागणी जास्त आहे. अगदी खेडोपाडय़ांतून या फळासाठी मागणी येत आहे.

– केशव दिडगे, शेतकरी, शिरूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:44 am

Web Title: dragon fruit is very effective in dengue
Next Stories
1 कुलगुरूंची ‘पात्रता’ पुन्हा वादात
2 शिधापत्रिकेवरील तूरडाळ महागच
3 डॉ. ढेरे म्हणजे संस्कृती व लोककला यांचा समन्वय साधणारा ज्ञानतपस्वी
Just Now!
X