यंदाही उशिराच जाग, कामे पूर्ण होण्याबाबत संदिग्धता

पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईसह अत्यावश्यक कामे पूर्ण करण्याचा संकल्प दरवर्षी करणाऱ्या महापलिकेला पावसाळा तोंडावर आला असतानाही कामे पूर्ण करण्यात अपयश आले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची कामे सुरू असून कामे पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदतही संपुष्टात आली आहे. नालेसफाईची जेमतेम ५० टक्के कामे कशीबशी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नालेसफाई अपूर्ण राहिल्यामुळे शहरात जागोजागी पाणी साठण्याचे प्रकार यंदाही होणार आहेत.

दरवर्षी मे महिना सुरू झाला की नालेसफाई, ओढे-नाल्यामधील राडारोडा उचलणे, नदीपात्रातील घनकचरा आणि प्लास्टिक उचलणे आदी पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांचे नियोजन केले जाते. यंदाही ३१ मे पर्यंत ही सर्व कामे करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र ३१ मे पर्यंत ही कामे पूर्ण होणार नाहीत, असे स्पष्ट झाल्यानंतर पावसाळ्यापूर्वीच्या या प्रकारच्या कामांना सात जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही नालेसफाईची कामे अपूर्णच असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये या प्रकारच्या कामांसाठी जवळपास ११० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातूनही नालेसफाईची कामे करण्यात येतात. त्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मे महिन्यातच पूर्ण झाली. निविदा प्रक्रिया, ठेकेदारांची नियुक्ती, नाल्यांचे सर्वेक्षण, धोकादायक ठिकाणे अशी सर्व आकडेवारी सर्वेक्षणाअंती अहवालाच्या माध्यमातून तयार झाली  पण त्यानंतर कामे अपेक्षित वेगात पूर्ण होऊ शकलेली नाहीत. यापूर्वी नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या होत्या. मध्यवर्ती भागात आणि उपनगरामध्ये घातक परिस्थिती उद्भवली होती. यंदाही अपूर्ण कामांमुळे हीच परिस्थिती उद्भावण्याची शक्यता अधिक आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात सध्या नालेसफाई आणि चेंबर दुरुस्तीची कामे महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहेत. ही कामे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये संपतील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात

आला आहे. पावसाळ्या पूर्वीची कामे एक जूनपर्यंत होणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी सात जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतवाढ दिल्यानंतरही ही कामे होऊ न शकल्यामुळे कोटय़वधींची ही रक्कम कुठे जाते, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

कामे कागदोपत्री

पावसाळ्यात नालेसफाई न झाल्यामुळे पाणी साठण्याच्या घटना घडल्यानंतर ही कामे कागदावरच झाल्याचे स्पष्ट होते. ही कामे अपूर्ण राहिल्यामुळे यंदाही कागदोपत्री कामे केल्याचे ठेकेदार आणि महापलिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रकार होतील, असा आरोप विरोधकांकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. मात्र नालेसफाईच्या नावाखाली पुणेकरांची कोटय़वधी रुपयांची रक्कम मात्र लाटली जाते का, अशी शंका यामुळे उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.