पाण्याचे राजकारण करू नका, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार एकीकडे करत होते, तेव्हाच उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कारभारी’ असलेल्या पिंपरी पालिकेकडून पक्षीय राजकारणातूनच आळंदीला पिण्यासाठी पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला जात होता. दुसरीकडे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडून ती प्रदूषित करण्याचे काम मात्र पालिकेने केले आहे. नदीप्रदूषणावर ठोस तोडगा न काढणाऱ्या व राज्यभरातील वारकऱ्यांना पालखीच्या तोंडावरही पाण्यासाठी ठेंगा दाखवणाऱ्या पिंपरी पालिकेचा दुटप्पीपणा कायमच आहे.
हद्दीलगत असलेल्या ‘तीर्थक्षेत्र’ आळंदीला पिण्याचे पाणी देऊ, अशी घोषणा िपपरी पालिकेने केली. मात्र, त्याचे श्रेय शिवसेनेला विशेषत: खासदार शिवाजीराव आढळराव यांना मिळत असल्याचे पाहून घूमजाव करण्यात आले. पाण्याचा प्रस्ताव वर्षभर टांगून ठेवत निर्णायक क्षणी कोणत्याही चर्चेशिवाय तो फेटाळून लावण्यात आला. चार वर्षांपासून पाण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आळंदीकरांनी अजितदादांसह राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सतत हेलपाटे मारले. मात्र, त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. आम्हालाच पाणी नाही तर तुम्हाला कुठून देऊ, असे कारण देत हात झटकले. किमान यात्रांच्या काळापुरते पाणी देण्यासही नकारघंटा मिळाली. किरकोळ गोष्टीही अजितदादांना विचारूनच करण्याची परंपरा असलेल्या िपपरीतील राष्ट्रवादी नेत्यांनी पाणी नाकारण्याचा निर्णयही त्यांच्या आदेशानुसारच घेतल्याची भावना आजही आळंदीकरांमध्ये आहे. आळंदीत माणसे राहत नाहीत का, पाणी देणार म्हणजे मेहेरबानी करणार होता का, त्याचे पैसे दिले जाणार होते, असा संताप आळंदीकरांना व्यक्त केला होता. पुण्यात पाण्याची कपात असताना दौंडला पाणी सोडण्यात आले होते. पाण्याच्या विषयात राजकारण नको असे आवाहन ‘साहेब’ करत असताना राजकीय दृष्टिकोनातून आळंदीच्या बाबतीत राष्ट्रवादीनेच वेगळी भूमिका घेतली, याकडेही लक्ष वेधले.
महापालिका त्यांच्याकडील घाण पाणी प्रक्रिया न करता इंद्रायणीत सोडते, त्यामुळेच इंद्रायणी प्रदूषित झाली, अशा संतप्त भावना आळंदी लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पालिकेकडे व्यक्त केल्या आहेत. आंदोलनाचे इशारे दिले, मात्र, सुधारणा होत नव्हती. आता चऱ्होली येथील मैलाशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे सांगत आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतील ड्रेनेजलाईन जोडण्यास परवानगी देण्याची तयारी पालिकेने दाखवली आहे. मूळ पाणी देण्याच्या विषयास बगल देऊन इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखणे व पर्यावरण समतोलास मदत होईल, अशा आशयाचा प्रस्ताव येत्या पालिका सभेत मंजुरीसाठी आहे. मंजुरी ते प्रत्यक्ष अंमलबजावणी यात बराच वेळ जाणार आहे. ३० जूनला माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यामुळे नदीप्रदूषण व पाणीपुरवठा हे दोन्ही विषय ‘जैसे थे’ राहणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.