बांबूपासून तयार केलेली सुपं, रोवळ्या, परडय़ा, हारे, करंडय़ा म्हणजे आयदान. ऊर्मिला पवार यांची आई आयदान करायची. आईच्या हातात अखंड फिरणारं आयदान आणि ऊर्मिला करीत असलेलं लेखन यांची वीण यातील साम्य आणि वेदनेचा धागा ‘आयदान’ या आत्मकथनातून उलगडला आहे. दलित आत्मकथनामध्ये स्वतंत्र स्थान असलेल्या ‘आयदान’ या कलाकृतीवर बेतलेले दोन अंकी नाटक रसिकांसमोर सादर होत आहे.
आविष्कार संस्थेने या नाटय़निर्मितीचा आविष्कार घडविला आहे. ऊर्मिला पवार यांच्या मूळ आत्मकथनाची रंगावृत्ती करण्याबरोबरच या नाटकाचे दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे. रामू रामनाथन यांची संकल्पना आहे. आविष्कार आणि अंजोर कम्युनिकेशन्स यांच्यातर्फे शुक्रवारी (२६ सप्टेंबर) घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता ‘आयदान’चा प्रयोग होणार आहे. अरुण काकडे यांनी नाटकाची निर्मिती केली असून नंदिता धुरी, शुभांगी सावरकर आणि शिल्पा साने यांच्या या नाटकामध्ये प्रमुख भूमिका आहेत.
कोकणातील दलित घरात जन्माला आलेली आणि लहानाची मोठी झालेली ऊर्मिला. प्रथम तिला दलित असल्याची जाणीव झाली. पुढे एका टप्प्यावर ती स्त्री असल्याची जाणीव खूपच भान आणणारी होती. हा सारा प्रवास, त्याकडे मिस्कीलपणे पाहण्याची तिची क्षमताच, तिला उभे राहण्याची ताकद देते. अशा अनेक ऊर्मिला, विमला, सुशीला किंबहुना एकूण सर्व स्त्रियांचे आयुष्य ऊर्मिला शब्दांनी आयदानाप्रमाणे विणून ठेवते. अर्थात अनेकींचं जगणं एका आत्मकथनातून आपल्यापर्यंत पोहोचते. या नाटकातून ऊर्मिला पवार यांच्या हृदयस्पर्शी जीवनाचे दर्शन घडते.