News Flash

‘आषाढातील एक दिवस’ नाटय़प्रयोग संख्येची पन्नाशी

दिग्दर्शक अतुल पेठे म्हणाले, हे जरी १९५८ मध्ये लिहिलेले नाटक असले तरी ते मला आजचे आपले नाटक वाटते. म्हणजे त्या नाटकात उपस्थित केलेले प्रश्न हे

| April 26, 2014 03:15 am

‘आषाढातील एक दिवस’ नाटय़प्रयोग संख्येची पन्नाशी

कवीचा राजकवी होताना सत्तेच्या आणि ऐहिक जगामध्ये सृजनशीलता आणि गाभ्याचे प्रश्न यांचे द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकाच्या प्रयोग संख्येने पन्नाशी गाठली आहे. एकीकडे व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली असली तरी प्रायोगिक रंगभूमीवरच्या नाटकांनी प्रेक्षकांना आकृष्ट केले आहे. ‘आषाढातील एक दिवस’ ही अनुवादित कलाकृती हे त्याचेच द्योतक आहे.
भारतीय रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाचा अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी मराठी अनुवाद केला आहे. नाटकघर आणि श्री सिद्धीविनायक निर्मित अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा २७ सप्टेंबर २०१३ रोजी शुभारंभाचा प्रयोग झाला होता. अवघ्या सात महिन्यांतच ४९ प्रयोग झालेल्या या नाटकाचा रविवारी (२७ एप्रिल) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी पाच वाजता सुवर्णमहोत्सवी प्रयोग होत आहे. ज्योती सुभाष, गजानन परांजपे, डॉ. दीपक मांडे, पर्ण पेठे, आलोक राजवाडे, ओम भूतकर, ऋचा आपटे, अधीश पायगुडे, रणजित मोहिते, तुषार गुंजाळ, कृतार्थ शेवगावकर आणि ऋतुराज शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नरेंद्र भिडे यांचे संगीत असून प्रसिद्ध धृपदगायक उदय भवाळकर यांनी पाश्र्वगायन केले आहे. प्रदीप वैद्य यांनी प्रकाशयोजना सांभाळली असून श्याम भूतकर यांनी वेषभूषा केली आहे. शेखर लोहोकरे या नाटकाचे निर्माते आहेत. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात (एनएसडी) शिक्षण घेत असताना या नाटकामध्ये भूमिका केलेल्या रोहिणी हट्टंगडी या सुवर्णमहोत्सवी प्रयोगाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दिग्दर्शक अतुल पेठे म्हणाले, ‘आषाढातील एक दिवस’ हे जरी १९५८ मध्ये लिहिलेले नाटक असले तरी ते मला आजचे आपले नाटक वाटते. म्हणजे त्या नाटकात उपस्थित केलेले प्रश्न हे आजही महत्त्वाचे वाटतात. चांगले साहित्य कुठल्याही काळाला, प्रांताला, भाषेला चिकटलेले नसते. ते साहित्य साऱ्या सीमा उल्लंघून माणसांचे प्रश्न मांडत असते. त्याला अपवाद नसलेल्या ‘आषाढातील एक दिवस’ नाटकाची वीण नाजूक आणि बांधणी चिरेबंदी आहे. नाटकाची भाषा तरल असून हे तीन अंकी नाटक म्हणजे दहा अभिनेत्यांनी एकत्र येऊन गायलेला विलंबित ख्याल आहे. तरुण रंगकर्मीना घेऊन असा राग आळविणे मला आव्हानात्मक आणि आनंददायी वाटते. वेगळ्या प्रकारचे नातेसंबंध हे नाटकाचे बलस्थान आहे. राजसत्ता आणि सृजनशीलता यांच्यातील झगडा दाखविताना कालिदासासारख्या महाकवीचे स्खलनही केले आहे.
राज्याच्या विविध भागात प्रयोग झालेल्या या नाटकाचा धारवाड येथील बी. व्ही. कारंथ रंग नमन राष्ट्रीय महोत्सव त्याचप्रमाणे नेहरू सेंटरच्या राष्ट्रीय महोत्सवात प्रयोग झाला आहे. इंदूर, उज्जैन यासह २५ ठिकाणांहून या नाटकाला निमंत्रणे आली आहेत, असेही अतुल पेठे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2014 3:15 am

Web Title: drama marathi play kalidas ashadhatil ek divas atul pethe
Next Stories
1 पुणे विद्यापीठाच्या गुणपत्रकांमध्ये आणि प्रमाणपत्रांमध्ये गैरव्यवहार
2 अवयव प्रत्यारोपणामध्ये आता पोलिसांची महत्त्वाची भूमिका!
3 पुण्यातील वीजकपात टळली
Just Now!
X