व्यक्तिचित्रांमधून स्वत:च्या वेदनांना वाट करुन देणाऱ्या प्रसिद्ध मेक्सिकन चित्रकार फ्रिदा काहलो यांच्यावरील ‘ओ फ्रिदा’ या प्रायोगिक नाटकाची बल्गेरियाच्या नाटय़ महोत्सवासाठी निवड झाली आहे. आठ तरुण नाटकवेडय़ांच्या प्रयत्नांमधून हे नाटक रंगमंचावर आले असून या महोत्सवात सहभागी होण्यासाठी या नाटकाला सध्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
‘इंटरनॅशनल यूथ थिएटर फेस्टिव्हल ऑफ व्रेमे अ‍ॅट व्रात्झा’ या महोत्सवासाठी हे नाटक निवडले गेले आहे. १२ ते १७ जून या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी या नाटकाच्या चमूला प्रत्येकी ५५ हजार असा एकूण सुमारे ४ लाख ४० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. निधी उभा करण्यासाठी या नाटकाचा प्रयोग ९ मे रोजी हिराबाग येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या नाटकाची प्रकाशयोजना सांभाळणारा मिहिर कुलकर्णी म्हणाला, ‘‘नाटकाच्या प्रयोगाव्यतिरिक्त आम्ही काही लोकांना आर्थिक मदतीबद्दल विनंती करतो आहोत. नाटकाची आमची ८ जणांची टीम आहे. आम्ही प्रत्येकजण स्वत: देखील पैसे जमवतो आहोत. पण आमच्यातील ६ जण अजून उच्च शिक्षण घेत आहेत, इतर दोन जणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे त्यामुळे त्याला काही मर्यादा आहेत.’’
प्रदीप वैद्य यांच्या ‘एक्स्प्रेशन्स लॅब’ शिबिरात ‘सोलो’ सादरीकरण म्हणून हे नाटक करायचे ठरले होते. त्यासाठी या नाटकाचा दिग्दर्शक अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री कृत्तिका देव यांनी फ्रिदा काहलो यांच्या जीवनाचा अभ्यास करायला सुरूवात केली. काहलो यांच्याबद्दल फारसे साहित्य उपलब्ध नाही, शिवाय जे साहित्य उपलब्ध आहे त्यातील बरेचसे स्पॅनिशमध्ये आहे. या अभ्यासातून फ्रिदाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या आधारे अभिषेकने हे नाटक लिहिले. माणूस आणि कलाकार या दोन्ही अंगांनी फ्रिदा काहलोच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला मागोवा, तिला झालेला गंभीर अपघात हा नाटकाचा केंद्रबिंदू आहे.