सत्ताधाऱ्यांच्या कृपेने मिळालेल्या विरोधी पक्षनेतेपदाचा लाभ घेताना सत्ताधाऱ्यांविषयी फार काही बोलायचे नसते, हा िपपरी पालिकेतील अलिखित नियम पाळत सध्याचे विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनीही आतापर्यंत मौनच पाळले होते. मात्र, पायउतार होण्याची वेळ आल्यानंतर ते बोलले. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नव्हे तर शिवसेनेच्या दुतोंडीपणाबद्दल. सत्तेत असूनही शिवसेनेने राज्यसरकारच्या विरोधात मोर्चा काढला, ही शिवसेनेची आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली ‘नौटंकी’ आहे, अशी टीका नढे यांनी केली आहे.
िपपरी प्राधिकरणाचा ‘पीएमआरडीए’मध्ये समावेश करण्यास विरोध असल्याचे सांगत शिवसेनेने प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढला, त्यावर नढे आणि नगरसेवक राहूल भोसले यांनी एक पत्र प्रसिध्दीस दिले आहे. शिवसेनेचा विरोध असताना मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव आलाच कसा, सेनेच्या एकाही मंत्र्यांनी विरोध कसा केला नाही. करे पाहता प्राधिकरणाचे विलीनीकरण निश्चित झाले असून त्यास भाजप-शिवसेना दोघेही जबाबदार आहे. स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी केलेले कारस्थान आहे. जनतेसमोर उघडे पडू नये म्हणून दिखावूपणासाठी मोर्चा काढण्याची खेळी शिवसेनेने केली. सत्ता असूनही ‘स्मार्ट सिटी’त शहराचा समावेश झाला नाही, ही युतीच्या दोन्ही पक्षाची  नामुष्की आहे. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न न सुटल्याने पाडापाडी सुरूच आहे. सरकार सामान्यांचे नसून धनदांडग्यांचे आहे, अशी टीका पत्रात आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने संघटक नंदकुमार सातुर्डेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने निलंबित केलेल्या आणि पदाला चिकटून बसलेल्या नढे यांचा ‘बोलवता धनी’ वेगळाच आहे. ते काँग्रेसची नव्हे तर दुसऱ्याच कुणाची तरी भूमिका मांडत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून काय दिवे लावले, हे सांगावे आणि स्वतच्या उंचीपेक्षा जास्त बोलू नये, असे त्यांनी म्हटले आहे.