दृक-श्राव्य माध्यमातून युद्धकथा उलगडून दाखवण्याचा उपक्रम यंदाही इतिहासप्रेमी मंडळातर्फे केला जात असून छत्रपती शिवाजीमहाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानावर केलेल्या हल्ल्याचा चित्तथरारक प्रसंग मंडळाने या वर्षी सादर केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी हिंद केसरी अमोल बराटे याच्या हस्ते करण्यात आले.
श्री शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानावर केलेल्या हल्ल्याला यंदा साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने ‘लाल महालातील शिवतांडव’ हा प्रसंग जिवंत करणारा दृक-श्राव्य कार्यक्रम मंडळातर्फे सादर करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी सांगितले. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या सभागृहात हा किल्ला तयार करण्यात आला असून १० नोव्हेंबर पर्यंत रोज सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत हे प्रसंगनाटय़ सादर केले जाणार आहे.
या किल्ल्यासाठी चाळीस फूट लांबीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. लाल महालात घडलेले नाटय़ आणि त्याचवेळी पुण्यात घडलेले नाटय़ ही युद्धकथा हजारो दिव्यांच्या तसेच फिरत्या रंगमंचाच्या साहाय्याने येथे प्रेक्षकांसमोर उलगडते. प्रसंगाचे निवेदन प्रभावी आणि अभ्यासपूर्ण असून अमोल कोल्हे यांचा अभिनय असलेली चित्रफीतही या वेळी दाखवली जाते.
उद्घाटन प्रसंगी हिंद केसरी बराटे, डॉ. सदानंद मोरे, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले, अभिनेता चंद्रशेखर कुलकर्णी, अजित आपटे, चारुदत्त आफळे, चिं. ना. परचुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध आधुनिक माध्यमांचा आधार घेऊन इतिहास समाजासमोर आणला पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. मोरे यांनी या वेळी व्यक्त केली.