जीवनातील सर्व घडामोडीचे चित्रण करणार; पिंपरीतील कलाकारांचा सहभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित नृत्य नाटिका (बॅले) लवकरच रंगमंचावर सादर होणार आहे. शहरातील कलावंतांना बरोबर घेऊन या नृत्य नाटिकेची रंगीत तालीम सुरू असून दोन महिन्यात ती रंगमंचावर येईल.

नंदकिशोर कल्चरल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कपोते यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर अधारित नृत्यनाटिकेचे दिग्दर्शन केले असून विजयकुमार गवई यांनी यासाठी संहिता लेखन केले आहे. डॉ. आंबेडकर यांचा जन्म झालेल्या महु गावापासून ते त्यांच्या जीवनातील सर्व चढउतार या नृत्यनाटिकेत दाखविले जाणार आहेत. डॉ. आंबेडकर यांचे पालनपोषण त्यांच्या आत्यानी केले तो प्रसंगही या नाटिकेत दाखविला जाणार आहे. याशिवाय शाळा शिकताना त्यांना संघर्ष पत्करावा लागला, शाळेत बसू देत नव्हते म्हणून वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले. याशिवाय विलायतेमधील ग्रंथालयात बसून अभ्यास करतानाचे प्रसंग, त्यानंतर भारतात झालेले आगमन त्यावेळी झालेला त्यांचा सन्मान, चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, नागपूर येथील धम्म दीक्षा आदी प्रसंग या नृत्य नाटिकेमधून श्रोत्यांना दाखविण्यात येणार आहेत.

नव्या पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची माहिती व्हावी, डॉ. आंबेडकर कोण होते, त्यांचे कार्य काय, या सर्व बाबी नृत्यनाटिकेच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे दिग्दर्शक कपोते यांनी सांगितले. िपपरी चिंचवड शहरातील कलाकारांना घेऊन ही नाटिका सादर करणार आहे. पन्नास कलाकरांचा संच असून लहान कलाकारापासून ते मोठय़ा वयाच्या कलाकारापर्यंत या नाटिकेत सहभाग आहे. ही नृत्य नाटिका संपूर्ण महाराष्ट्रात याशिवाय दिल्ली येथे सादर करण्याचा मानस आहे. अशाच पद्धतीची नाटिका पंधरा वर्षांपूर्वी पुण्यात सादर झाली होती.