माहिती तंत्रज्ञानाचे युग आणि मनोरंजनाची साधने विपूल झाली असली तरी मुलांचे रंजन करणारी बालनाटय़े जोमात सुरू आहेत. एकीकडे मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रेक्षकांची प्रतीक्षा आहे. मात्र, मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे ‘राजा-राणी’, ‘सिंड्रेला’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’ या पारंपरिक विषयांबरोबरच लोकप्रिय कार्टून व्यक्तिरेखांवर आधारित बालनाटय़ पाहण्यासाठी मुलांची गर्दी होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती असलेले भरत नाटय़ मंदिर हे बालनाटय़ासाठीची पंढरी मानली जाते. काही वर्षांपूर्वी भरत नाटय़ मंदिरासह बालगंधर्व रंगमंदिर आणि टिळक स्मारक मंदिर ही तीनच नाटय़गृहे होती. मात्र, शहराचा विस्तार झाल्यानंतर बालनाटय़ाचा प्रेक्षक देखील विखुरला गेला. पुणेकरांची सांस्कृतिक भूक भागविण्याच्या उद्देशातून महापालिकेने कोथरूड, पद्मावती, औंध, वानवडी येथे नाटय़गृहे उभारली आहेत. या सर्वच ठिकाणी बालनाटय़ होत असल्याने त्या त्या भागात राहणाऱ्या बालप्रेक्षकांची सोय झाली आहे.
मात्र, असे असले तरी भरत नाटय़ मंदिराचे महत्त्व कमी झालेले नाही. परीक्षा संपून शाळांना सुट्टी लागल्यानंतर १४ एप्रिलपासून ते मे अखेपर्यंत विविध नाटय़संस्थांची ३५ बालनाटय़े होत असल्याची माहिती विश्वास पांगारकर यांनी दिली. ‘हिमगौरी आणि सात बुटके’, ‘सिंड्रेला’, ‘श्यामची आई’ या पारंपरिक विषयांबरोबरच ‘डोरेमॉन आणि छोटा भीम’ या लोकप्रिय कार्टून व्यक्तिरेखांवर आधारित बालनाटय़े सादर होत आहेत. प्रकाश पारखी, नयना आपटे, प्रवीणकुमार भारदे, स्वाती उपाध्ये, देवदत्त पाठक, राजा राणा, नितीनकुमार, मंदार बापट असे नाटय़निर्माते आणि नाटय़प्रशिक्षक हे सातत्याने बालरंगभूमी चळवळीमध्ये कार्यरत आहेत. केवळ मनोरंजन नाही तर, नाटकातून मुलांना काही शिकायला मिळावे या दृष्टीने संस्कारक्षम नाटकांची निर्मिती होत आहे. बालनाटय़े अगदी हाऊसफुल्ल होत नसली तरी ही नाटके पाहण्यासाठी बालकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी १ ते ४ या वेळात बालनाटय़े होतात. नाटय़संस्कार कला अकादमी, प्रेरणा कला मंच, गुरुकुल रंगभूमी या संस्था अगदी नाममात्र तिकिटदर आकारून मुलांसाठी बालनाटय़ सादर करतात, असे पांगारकर यांनी सांगितले.
ऑनलाइन बुकिंग
माहिती तंत्रज्ञानाच्या युगाची कास धरत भरत नाटय़ मंदिराने बालनाटय़ांच्या तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग सुरू केले आहे. मुलांना तिकिटाविना परत जावे लागू नये यासाठी पालकांच्या मागणीनुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टेलिफोन बुकिंगही घेतले जात असल्याचे विश्वास पांगारकर यांनी सांगितले.

savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे