19 October 2020

News Flash

नाटय़प्रयोगांना निवडणूक आणि आयपीएलचा फटका

दरवर्षी मे महिन्याची सुटी हा नाटकांसाठीचा सुगीचा हंगाम असतो. मात्र, यंदा लोकसभेची निवडणूक आणि आयपीएल क्रिकेटचे सामने याचा फटका नाटकांना बसला. आता फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेमुळे

| June 14, 2014 03:10 am

लोकसभेची निवडणूक आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांचे आयपीएल याचा फटका नाटय़प्रयोगांना बसला असून यंदाचा मे महिना नाटय़ व्यवसायासाठी फोल ठरला आहे. पुण्यामध्ये रुजलेली प्रायोगिक नाटकांची चळवळदेखील सुटीच्या कालखंडात मंदावली होती. आता फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेमुळे नाटकांच्या प्रयोगांनी धास्ती घेतली आहे.
दरवर्षी मे महिन्याची सुटी हा नाटकांसाठीचा सुगीचा हंगाम असतो. मात्र, यंदा लोकसभेची निवडणूक आणि आयपीएल क्रिकेटचे सामने याचा फटका नाटकांना बसला. नाटय़गृहामध्ये जाऊन नाटकाचा आनंद लुटण्यापेक्षा पुणेकरांनी घरबसल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर राजकीय बातम्या आणि चर्चा पाहणे पसंत केले. त्यामुळे नाटय़व्यवस्थापकांनीही रंगमंदिराचे आरक्षण करताना हात आखडता घेतला. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मे महिन्यांतील सर्व वेळांवर रंगमंचीय कार्यक्रम होऊ शकले नाहीत. तर, काही दिवशी नाटकाचे प्रयोग रद्द करावे लागले. मतमोजणीच्या दिवशी रात्रीचा ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा प्रयोग आधीच रद्द करण्यात आला होता. संपूर्ण मे महिन्यांत बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नाटकाचे ३१ प्रयोग झाले. लावण्यांचे १७ कार्यक्रम झाले. बालनाटय़ाचे ६ प्रयोग, मराठी गीतांचे २ कार्यक्रम तर, खासगी संस्थांचे १८ कार्यक्रम झाले. यंदाच्या सुटीमध्ये प्रथमच रंगमंदिराच्या सर्व स्लॉटचा उपयोग होऊ शकला नाही.
प्रायोगिक चळवळीचे केंद्र असलेल्या सुदर्शन रंगमंच येथे रंगकर्मी अनिरुद्ध खुटवड यांची ‘नाटक- वास्तव आणि आभासी’ या विषयावर २० दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली होती. उर्वरित दहा दिवसांपैकी ग्रिप्स चळवळीतील नाटकांचे पाच प्रयोग झाले, अशी माहिती शुभांगी दामले यांनी दिली. युवकांच्या परीक्षा मे महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असतात. महाविद्यालयीन तरुण पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक यांसारख्या स्पर्धामध्ये गुंतल्यानंतर या काळामध्ये अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. तर, पदवी संपादन केल्यानंतर जीवनामध्ये स्थिरस्थावर होण्याकडे त्यांचा कल असतो. प्रायोगिक नाटकामध्ये काम करण्यापेक्षाही काही युवक  मालिका, चित्रपट, लघुपट या माध्यमांकडे वळतात. त्याचाही फटका प्रायोगिक नाटकांना बसल्याने ही चळवळ काहीशी मंदावली हे वास्तव असल्याचे त्यांनी सांगितले.
—चौकट—
महात्मा फुले नाटय़गृहातील
नाटकाचा आज उघडणार पडदा
हडपसर-वानवडी परिसरातील नाटय़रसिकांसाठी महापालिकेने उभारलेल्या महात्मा फुले नाटय़गृहाचा पडदा शनिवारी (१४ जून) उघडणार आहे. ७१३ आसनक्षमतेच्या या नाटय़गृहामध्ये नाटय़ाचार्य गोिवद बल्लाळ देवल स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘मि. अॅन्ड मिसेस’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या नाटय़गृहाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर या नाटय़गृहामध्ये शनिवारी पहिलाच व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 3:10 am

Web Title: drama theater fail may ipl election
टॅग Election,Fail,Ipl
Next Stories
1 कर्वेनगरमधील घरे नियमित करण्याचा प्रश्न सुटला
2 पुणेकर आदित्यची ‘धवन’ भरारी! –
3 जनता दरबार आता पोलीस आयुक्तांच्या कक्षात
Just Now!
X