वानवडीत महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या महात्मा फुले सांस्कृतिक भवन व नाटय़गृहाचे काम पूर्ण झाले असून या वास्तूचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे. शहराच्या पूर्व भागातील हे पहिले सुसज्ज नाटय़गृह असून या प्रकल्पासाठी पंचवीस कोटी रुपये खर्च आला आहे.
स्थानिक नगरसेविका कविता शिवरकर आणि नगरसेवक सतीश लोंढे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. वानवडीत चाळीस हजार चौरस फूट जागेवर हे नाटय़गृह उभारण्यात आले असून त्याची आसन क्षमता साडेसातशे एवढी आहे. नाटय़गृहाच्या या कामाला २००३ मध्ये सुरुवात करण्यात आली होती आणि दहा वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
तत्कालीन नगरसेवक बाळासाहेब शिवरकर, तसेच शिवाजी केदारी, अभिजित शिवरकर यांनीही या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला तसेच महापालिकेच्या अंदाजपत्रकातून आर्थिक तरतूदही करून दिली. बाळासाहेब शिवरकर यांनी नाटय़गृह व संकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. हे नाटय़गृह वातानुकूलित असून महत्त्वाच्या व्यक्तींसाठीचा कक्ष, कलाकारांना नाटकाची तालीम करण्यासाठीचा कक्ष, रंगपटाचा कक्ष आदी सुविधा नाटय़गृहात आहेत. नाटय़गृहातील ध्वनियंत्रणा व प्रकाश योजनाही अत्याधुनिक असून त्यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. नाटय़गृहाच्या प्रवेशद्वारात महात्मा फुले यांच्या जीवनावरील भव्य समूहशिल्पही लावण्यात आले आहे.
नाटय़गृहासाठी सत्तावीस हजार चौरस फुटांचे भव्य पार्किंगही बांधण्यात आले असून त्यात अडीचशे चारचाकी आणि अडीचशे दुचाकी वाहने उभी करता येतील. या संकुलाच्या आवारात प्रत्येकी पाच हजार चौरस फुटांची दोन बहुउद्देशीय सभागृह देखील बांधण्यात येत आहेत.

  • – नाटय़गृहाचे उद्घाटन १९ फेब्रुवारीला
  • – साडेसातशे आसनक्षमतेचे नाटय़गृह
  • – संपूर्ण नाटय़गृह वातानुकूलित
  • – पाचशे वाहनांच्या पार्किंगची सुविधा