चिन्मय पाटणकर

प्रेक्षकांना नाटकाच्या तिकिटासाठी ऑनलाइन बुकिंगचा जादा खर्च करण्याची किंवा नाटय़गृहापर्यंत जाण्याचे कष्ट करण्याची गरज नाही. कारण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नाटकाची तिकिटे रसिकांना घरपोच मिळू लागली आहेत.

खाद्य पदार्थापासून टीव्ही, फ्रिजसारखी कुठलीही वस्तू आता घरपोच मिळू लागली आहे. नाटकाच्या तिकिटांसाठी ऑनलाइन बुकिंगचा पर्याय उपलब्ध असला, तरी आता नाटकाची तिकिटे थेट घरपोच मिळू लागली आहे. पुण्यातील नाटय़ वर्तुळात हा नवा कल उदयाला येत असून, नाटकाचा प्रेक्षक वाढण्यासाठी ही कल्पना उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.

नाटकाला जायचे झाल्यास प्रेक्षकांना ऑनलाइन बुकिंग करण्याशिवाय नाटय़गृहाच्या तिकीट खिडकीवर जाण्याशिवाय पर्याय नाही. ऑनलाइन बुकिंगसाठी संबंधित संकेतस्थळाकडून प्रत्येक तिकिटासाठी ‘हँडलिंग चार्जेस’च्या रूपात २० ते ३० रुपये जास्त आकारले जातात. त्यामुळे एका कुटुंबातील पाच जणांना जायचे असल्यास ऑनलाइन बुकिंगमध्ये तिकीट खर्चाशिवाय जास्तीचे १०० ते १५० रुपये जास्त खर्च करावे लागतात. मात्र, आता घरपोच तिकिटे मिळू लागल्याने प्रेक्षकांना नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. कुरिअर व्यावसायिक संदीप चाफेकर यांनी घरपोच नाटकांची तिकिटे देण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रेक्षकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

‘नाटकाचे तिकीट ऑनलाइन काढल्यावर मोबाइल दाखवून प्रवेश करण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे नाटकाचे तिकीट घरपोच मिळाल्यास प्रेक्षकांसाठी ते नक्कीच सोयीचे ठरेल. या विचारातून प्रयोग सुरू झाला. नाटकाची घरपोच तिकिटे ही कल्पना सध्याच्या व्यवस्थेच्या एक पाऊल पुढे आहे. कारण ऑनलाइन तिकिटाच्या व्यवहारात प्रेक्षकांना आधी पैसे द्यावे लागतात. तर आम्ही तिकीट घरपोच करून पैसे घेतो. त्यासाठी काही माफक शुल्क आकारतो. प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर आम्ही चार-पाच नाटकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सध्या दररोज वीस ते पंचवीस तिकिटे या प्रमाणे घरपोच तिकिटे दिली जातात. हे प्रमाण येत्या काळात नक्कीच वाढणार आहे. स्वाभाविक त्याचा फायदा नाटकाचा प्रेक्षक वाढण्यासाठीही होईल,’ असं संदीप चाफेकर यांनी सांगितलं.

जवळपास सात वर्षांपूर्वी फोन बुकिंग सुरू झालं. त्याला प्रतिसाद मिळत होता. मात्र ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था निर्माण झाल्यावर फोन बुकिंग कमी झालं. सध्या ऑनलाइन बुकिंग जवळपास ५० ते ६० टक्के आणि प्रत्यक्ष खिडकीवर येऊन ३० टक्के बुकिंग होतं. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच तिकीट मिळण्याचा फायदा होईल. घरपोच मिळणाऱ्या तिकिटांवर आसन क्रमांक नमूद केलेला असल्याने कोणतीही अडचण येत नाही. या नव्या व्यवस्थेचा प्रेक्षक वाढण्यासाठी फायदा होईल अशी अपेक्षा आहे. घरपोच तिकिटांची ही कल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत.

– प्रवीण बर्वे, नाटय़ व्यवस्थापक