चाकण एमआयडीसीमधील प्लॅस्टिकची खेळणी बनविणाऱ्या ‘ड्रीम प्लास्ट’ या कंपनीला रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत कोटय़वधीचे नुकसान झाले. अग्निशामक दलाला सहा बंब आणि पाच टँकर यांच्या साहाय्याने तब्बल सहा तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत सुदैवाने कोणालाही शारीरिक इजा झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रीम प्लास्ट प्रा. लि कंपनीच्या मोल्िंडग शॉपमध्ये रविवारी सकाळी सहाच्या सुमारास सुरक्षारक्षकाला आग लागल्याचे आढळून आले. घटनेची माहिती अग्निशामक दल आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. सुरूवातीला घटनास्थळी तीन अग्निशामक आणि टँकर पोहोचले. मात्र, कंपनीत प्लॅस्टीकचा कच्चा माल, फर्निचर असल्यामुळे आग वाढत होती. त्यामुळे आणखी तीन अग्निशामक गाडय़ा बोलविण्यात आल्या.  सहा गाडय़ा, पाच टँकर आणि अग्निशामक दलाच्या पन्नास जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी फोम आणि पाण्याचा मारा केला जात होता. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीचे दरवाजे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.
आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे धुराचे लोट निघत होते. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर दुपारी बाराच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमध्ये कंपनीचे मोल्डिंग शॉप, यंत्रसामुग्री, कच्चा माल, शेड जळून खाक झाले. यामध्ये कोटय़वधीचे नुकसान झाले आहे. या कंपनीत रात्र पाळीवर कामगार नसतात. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 
आग विझविण्यासाठी सव्वा लाख लिटर पाणी!

ड्रीम प्लास्ट प्रा. लि. या प्लॅस्टिकच्या कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर पालिका, बजाज आणि महिंद्रा कंपन्या यांच्या अग्निशामक गाडय़ांचा वापर करण्यात आला. ही आग विझविण्यासाठी तब्बल पाण्याचे ३२ टँकर पाणी वापरण्यात आले. एका टँकरमध्ये साधारण चार हजार लिटर पाणी असते. त्यामुळे ही आग विझविण्यासाठी एक लाख २८ हजार लिटर पाण्याचा वापर करावा लागला.