४४ टक्क्य़ांनी घट; दसऱ्याला पाच हजार नवी वैयक्तिक वाहने रस्त्यांवर

पुणे शहरात वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावरही मोठय़ा संख्येने नवी वाहने रस्त्यावर येतील, असा अंदाज असताना मागील वर्षांच्या तुलनेत यंदा दसऱ्याच्या कालावधीतील वाहन खरेदीत ४४ टक्क्य़ांनी घट झाली. मागील दसऱ्याला नागरिकांनी तब्बल नऊ हजार वैयक्तिक वाहनांची खरेदी केली होती. ही संख्या यंदा घटली असली, तरी सुमारे पाच हजार वैयक्तिक नवी वाहने शहरातील रस्त्यांवर आली आहेत.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रामुख्याने वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असते. दसऱ्याच्या आधी दोन ते तीन दिवस वाहन खरेदी करून दसऱ्याच्या दिवशी आरटीओतील नोंदणी पूर्ण करून वाहन घरी नेण्याचा अनेकांचा कल असतो. गुरुवारी दसरा असल्याने सोमवारपासूनच वाहन खरेदी आणि नोंदणी सुरू करण्यात आली होती. पुणे शहरामध्ये सध्या वाहनांची संख्या ३६ लाखांवर पोहोचली आहे. लोकसंख्येपेक्षाही वाहनांची संख्या अधिक असून, राज्याच्या कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यातील वाहन संख्या अधिक आहे. रोज सुमारे हजार नव्या वाहनांची नोंद होत असते. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर दरवर्षी विक्रमी वाहनांची नोंद केली जात आहे. मागील वर्षी दसऱ्यातील वाहन खरेदीने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडून साडेआठ हजारांहून अधिक वाहनांची खरेदी झाली होती. त्यानंतर दिवाळीतील वाहन खरेदीने दसऱ्याचा विक्रम मोडीत काढला. मागील वर्षी दिवाळीत साडेदहा हजारांच्या आसपास नव्या वाहनांची खरेदी झाली.

यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर मात्र मागील वर्षांच्या तुलनेत वाहन खरेदीत घट झाली. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सोमवार ते गुरुवार या चार दिवसांच्या कालावधीत ४ हजार ११५ दुचाकी आणि ९७० मोटारींची नोंदणी करण्यात आली. त्यातून आरटीओला २० कोटी ६५ हजारांचा महसूल मिळाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मागील वर्षी नोटाबंदीनंतरचा पहिला दसरा आणि सेवा, वस्तू कराच्या अंमलबजावणीचा परिणाम म्हणून काहीसे मंदीचे वातावरण होते. मात्र, त्याच वर्षी विक्रमी वाहन खरेदी झाली. नेहमीप्रमाणे यंदाही वाहन कंपन्या आणि विक्रीच्या दालनांकडून ग्राहकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या असल्या, तरी खरेदीत घट झाली आहे. वाहनांची झपाटय़ाने वाढ आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या लक्षात घेता वाहन खरेदीतील घट ही वाहतूक समस्येवरील उतारा ठरणारी आहे.

मोटारींच्या खरेदीत ६७ टक्क्य़ांनी घट

मागील वर्षी दसऱ्याला साडेपाच हजारांच्या आसपास दुचाकींची खरेदी झाली होती. यंदा ही संख्या हजार ते बाराशेने घटली आहे.  मोटारींच्या खरेदीत यंदा कमालीची घट झाली आहे. २०१६ मध्ये दसऱ्याला २०२३ मोटारींची खरेदी झाली होती. मागील वर्षी दसऱ्याला सर्वाधिक २९४८ मोटारींची खरेदी झाली होती. दिवाळीतही २०७५ मोटारी खरेदी करण्यात आल्या. यंदा मात्र मोटारींच्या खरेदीमध्ये ६७ टक्क्य़ांनी घट होत केवळ ९७० नव्या मोटारींची नोंदणी होऊ शकली.