करोना व्हायरसचा देशभरात दिवसेंदिवस वाढता प्रार्दुर्भाव लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी  14 एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असेही सांगण्यात आले आहे.  मात्र तरी देखील अनेकजण विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात विनाकारण बाहेर फिरणार्‍या नागरिकांवर आजपासून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जात आहे. शिवाय अशा नागरिकांवर कडक कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.

जगभरात करोना व्हायरस या आजारामुळे थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने देशात लॉक डाऊन जाहीर केले आहे शिवाय अनेक उपाययोजना देखील केल्या जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून सातत्याने केले जात आहे. या साठी जागोजागी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र तरी देखील काही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत.

या संदर्भात पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम म्हणाले की, पुणे शहर आणि परिसरात अनेक भागात विनाकारण नागरिक बाहेर फिरताना दिसत आहे. अशा नागरिकांना आवर घालण्यासाठी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे आणि अशा नागरिकांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. तसेच आजपर्यंत जमाव बंदीचा आदेश मोडणाऱ्या 300 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्याची परिस्थिती आणि सरकारकडून करण्यात येत असलेल्या सूचना लक्षात घेता. नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

करोनाने राज्यात थैमान घातलं असून सर्वात जास्त प्रभाव मुंबई आणि पुण्यात पहायला मिळत आहे. दरम्यान आज पुण्यात करोनाचा पहिला बळी गेला असून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे राज्यातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. यासोबत देशात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.