परिवर्तन संस्थेने रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या सहकार्याने मराठवाडय़ातील बीड जिल्हय़ामध्ये दुष्काळाने होरपळलेल्या दोनशे गरजू कुटुंबांना ‘परिवर्तन जीवन किट’चे वाटप करून त्यांच्या एक महिन्याच्या भोजनाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू असून, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची मदत करून खारीचा वाटा उचलत आहे. दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी सरकारतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांबरोबरच सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थाही आपापल्या परीने मदत करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. परिवर्तन संस्थेने रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या सहकार्याने दुष्काळाची तीव्रता असलेल्या बीड जिल्हय़ातील पिंपरगव्हाण, मुर्शदपूर, रुई, पिंप्रोळी (बुद्रुक), शिरापूर आणि समनापूर या सहा गावांना भेट दिली. गरीब शेतमजूर आणि निराधार अशा दोनशे कुटुंबांची पाहणी करून त्यांना परिवर्तन जीवन किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये १५ किलो ज्वारी, प्रत्येकी दोन किलो वाटाणा आणि चवळी तसेच एक किलो तेल असा साधारण एक महिना पुरेल एवढा शिधा समाविष्ट आहे. त्यासाठी एकूण चार टन धान्य लागले.
या उपक्रमामध्ये परिवर्तन संस्थेचे बीड जिल्हाप्रमुख सोनाजी बहिर, अशोक जाधव, बीड येथील नगरसेवक युवराज जगताप, रोटरी क्लबचे रमेश शिंगवी आणि पल्लवी कोरे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे सदस्य धीरज टिळेकर यांनी त्यांची मुलगी ईशा हिच्या वाढदिवसाचा खर्च टाळला आणि परिवर्तन जीवन किटसाठी ११ हजार रुपयांची देणगी दिली, अशी माहिती संस्थेचे किशोर ढगे यांनी दिली.