|| तानाजी काळे

रब्बी हंगामात पेरण्या अपूर्ण; हुरडाप्रेमींची निराशा

ज्वारीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदापूरसह सोलापूर, मराठवाडय़ात या वर्षी पावसाअभावी ज्वारीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. पेरणी करून उगवलेली ज्वारीची पिके पाण्याअभावी जळाल्याने यंदा शिवारातील हुरडा पाटर्य़ावर संक्रांत ओढवली आहे.

रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरण्या झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात नाताळाच्या सुट्टीदरम्यान ज्वारी चांगली हुरडय़ामध्ये येते. कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळी आणि सायंकाळी शहरातील मंडळी हमखास गावाकडे हुरडय़ाची लज्जत घेण्यासाठी येतात. विविध प्रकारच्या चटण्या, दही, खजुरीबरोबर हुरडय़ाची चव काही औरच असते. मात्र या वर्षीच्या दुष्काळामुळे हुरडाच नसल्याने हुरडा पाटर्य़ावर संक्रांत कोसळली आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात चालणाऱ्या या पाटर्य़ा यंदा दुर्मीळ झाल्याने हौशी मंडळीची निराशा झाली आहे.

ज्वारीच्या पेरण्या न झाल्याने पुढील वर्षी ज्वारीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घटणार आहे. ज्वारीचे दर सध्या तेजीत असून गेल्या पंधरा दिवसांत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चार हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. आगामी काळात ज्वारीच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत नगदी पिके, फळबागा आणि ऊसलागवडीला शेतकरी महत्त्व देत असल्याने दिवसेंदिवस ज्वारीच्या पेरणीखालील क्षेत्र घटत चालले आहे. त्यामुळे यंदा ज्वारीच्या वाणाला मोठा तडाखा बसला आहे.

शिवारात ज्वारीची पिके नसल्याने हुरडय़ातील ज्वारीचे दाणे टिपण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांची आबाळ होत आहे. ज्वारी हुरडय़ात येताच चिमणी, कावळा, भोरडी, चिवळा असे विविध जातींचे पक्षी भल्या पहाटेपासून हुरडय़ावर ताव मारतात. पक्ष्यांपासून ज्वारीच्या पिकाची राखण करण्यासाठी पिकात उंच लाकडी माळा करून त्यावर उभे राहून गोफणीने पक्ष्यांवर दगड भिरकावत आरडाओरडा करावा लागतो. ज्वारीची कितीही राखण केली तरीही पक्षी हुरडा खातात. भोरडी हा पक्षी तर ज्वारीच्या आगारात हुरडय़ाच्या दिवसात स्थलांतर करून येतो. ज्वारीच्या पेरणीबरोबरच करडईचीही पेरणी असते. करडई साधारणपणे मार्च, एप्रिलमध्ये परिपक्व होते.करडई खाण्यासाठी कुरकुंजी पक्षी कायम येतात. मात्र, आता करडईचे पीकक्षेत्र घटल्यामुळे सुगीच्या दिवसातील पक्ष्यांची धांदल, राखणीसाठी शेतकऱ्यांची लगबग, पक्ष्यांना हुसकून लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाकांनी दुमदुमलेला शिवार, हुरडा भाजण्यासाठी पेटलेल्या आखटय़ांचा धूर या साऱ्या गोष्टी शिवारातून लुप्त झाल्या आहेत.