मद्यपान करून भरधाव वाहन चालविण्याच्या प्रकारांमध्ये शहरात दिवसेंदिवस वाढच होत आहे. याला आळा घालण्याच्या दृष्टीने वाहतूक शाखेकडून वेळोवेळी कारवाईही करण्यात येते. मात्र, हे प्रकार थांबण्याची चिन्हे नसल्याने उपाय म्हणून या तळीरामांचा वाहन परवाना ९० दिवसांसाठी रद्द करण्याबरोबरच तळीराम वाहनचालकांची नावे जाहीरपणे प्रसिद्ध करण्याची योजना वाहतूक पोलिसांनी सुरू केली असून, त्यानुसार अशा पद्धतीची एक यादी जाहीरही करण्यात आली आहे.
मद्यपान करून वाहन चालविण्याच्या प्रकारातून संबंधित वाहन चालकाबरोबरच रस्त्यावरून जाणाऱ्या इतरांनाही धोका होऊ शकतो. मद्यपान करून वाहन चालविणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असला, तरी असे प्रकार सर्रासपणे होत असल्याचे शहरातील रस्त्यांवर दिसून येते. नववर्षांच्या स्वागताच्या रात्री वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारांबाबत मोठय़ा प्रमाणावर कारवाई केली जाते. त्यात शेकडो तळीराम सापडतात. मात्र, इतर वेळेलाही मद्यपान करून वाहने चालविणारे तळीराम आढळून येत आहेत.
जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मद्यपान करून भरधाव वाहन चालविणाऱ्या एक हजार ४०६ तळीरामांवर वाहतूक शाखेने कारवाई केली होती. त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी २०१५ चे मार्च २०१५ पर्यंत अशा प्रकारचे ६४ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहन चालकांचा वाहन परवाना ९० दिवसांसाठी निलंबित केला आहे. परिवहन कार्यालयाने दिलेल्या वाहन परवाना निलंबन निकालाच्या यादीमध्ये संबंधित तळीराम वाहन चालकाची नावे व वाहनांचे क्रमांकही आहेत. या नावांची यादी वाहतूक शाखेने प्रसिद्धीसाठी पाठवून ती जाहीर केली आहे. यातील काही नावे प्रसिद्ध झाल्यास इतर वाहन चालकांवर त्याचा परिणाम होईल व त्यांच्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा वाहतूक शाखेकडून व्यक्त होत आहे.